
घाटकोपर पूर्व येथील कामराज पुनर्वसन प्रकल्पातील नवीन वसाहतीस ‘भारतरत्न स्वातंत्र्यसेनानी के. कामराज’ यांचे नाव द्यावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. यासंदर्भात तेलुगू समाज प्रतिष्ठानतर्फे शासन, एमएमआरडीए आणि एसआरए अधिकाऱयांकडे निवेदन देण्यात आले आहे.
एमएमआरडीए व एसआरए यांच्या संयुक्त भागीदारीत येथील सुमारे 31.85 हेक्टर जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पात 17 हजार घरे बांधण्यात येणार असून त्यातील 6.95 हेक्टर क्षेत्रावर पहिल्या टप्प्यात 4,345 मोफत घरे उभारली जात आहेत. ही घरे कामराज नगर येथील मूळ रहिवाशांना पुनर्वसनासाठी देण्यात येणार असून याअंतर्गत 22 मजली 11 इमारतींचे बांधकाम सुरू आहे. गेल्या 50 वर्षांपासून ही वसाहत ‘कामराज नगर’ म्हणूनच ओळखली जाते. स्थानिक पत्रव्यवहार, शासकीय नोंदी आणि सार्वजनिक ठिकाणीदेखील हे नाव प्रचलित आहे. त्यामुळे या नव्या पुनर्वसन वसाहतीला ‘भारतरत्न के. कामराज नगर’ हेच नाव अधिकृतरीत्या देऊन त्यांचा सन्मान करण्याची मागणी तेलुगू समाज प्रतिष्ठानतर्फे सेव्रेटरी गणेश भुमय्या बट्टू यांनी केली आहे.






























































