केंद्राने स्वतःची जबाबदारी राज्यावर ढकलून जनतेला वाऱयावर सोडले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून केंद्राने आपली जबाबदारी राज्य सरकारवर ढकलून जनतेला वाऱयावर सोडले आहे. पण राज्य सरकारने जनतेला वाऱयावर सोडू नये. वेळप्रसंगी कर्ज काढावे आणि सर्वांचे लसीकरण करावे, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली.

नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत कोरोनावरून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. कोरोनाच्या भयानक स्थितीचा महाराष्ट्र सामना करत असताना केंद्र सरकारने राज्याला योग्य ती मदत करणे अपेक्षित आहे. परंतु रेमडेसिवीर, ऑक्सिजनअभावी जीव जात असतानाही त्यात राजकारण केले जात आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे.

राज्य सरकारने रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी निविदा काढली असता दोन कंपन्या ज्या आतापर्यंत राज्याला दररोज 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देत होत्या त्यांनी आश्चर्यकारकरीत्या आपली भूमिका बदलून 31 मे पर्यंत आम्ही महाराष्ट्राला दररोज फक्त 500 इंजेक्शनचा पुरवठा करू, असे सांगितले. या कंपन्यांच्या बदललेल्या भूमिकेमागे केंद्र सरकारने त्यांच्यावर टाकलेला दबाव कारणीभूत आहे का? राज्याला रेमडेसिवीर मिळू नये आणि इथली स्थिती बिघडावी, असा केंद्राचा प्रयत्न आहे का? असे सवाल पटोले यांनी केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुका असलेल्या राज्यात कोरोना नाही अशी मुक्ताफळे उधळली आहेत. निवडणुकीमुळे कोरोना नष्ट होत असेल तर मग केंद्रातील सरकारही बरखास्त करून  देशात निवडणुका लावाव्यात म्हणजे कोरोना नष्ट होईल, असा टोलाही पटोले यांनी लगावला.