माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकरांनी उल्लेख केलेले ‘दादा’ कोण?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात, येरवड्याच्या जमीन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत तत्कालीन पालकमंत्री ‘दादा’ यांचा त्यासाठी दबाव होता असा उल्लेख केला आहे. बोरवणकरांनी उल्लेख केलेले मंत्री ‘दादा’ कोण? हे जनतेला कळाले पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

सरकारबद्दल पोलीस प्रशासनात तीव्र नाराजी आहे, फोन टॅपिंग प्रकरणाने प्रतिमा डागळलेल्या रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक बनवण्याचा घाट भाजपाच्या काही लोकांनी घातला होता. राज्यात काय चाललंय? असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित करत एखाद्या अधिकाऱ्याने घोटाळ्याबद्दल वक्तव्य केले तर त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याची धमकी कसली देता? जर तुम्ही काही केलेले नाही, तर घाबरता कशाला? असा प्रश्नही नाना पटोले यांनी विचारला आहे.

लोक घरातही सुरक्षित नाहीत आणि बाहेरही सुरक्षित नाहीत

समृद्धी महामार्गावर वैजापूर येथे अपघात होऊन 12 लोकांचा मृत्यू झाला ही अत्यंत दुःखद घटना आहे. मागील 9 महिन्यात समृद्धी महामार्गावर 860 अपघात झाले व त्यात एक हजार लोक मरण पावले आहेत, जखमीही झाले आहेत. अपघात झाले की सरकार चौकशी करण्याची घोषणा करते, अशा किती चौकशा करणार? आणि याआधी घोषणा केलेल्या चौकशांचे काय झाले? याचे उत्तर आधी द्या. या महामार्गाने कोणाची समृद्धी झाली हे सर्वांना माहित आहे. भाजपाप्रणित शिंदे सरकारच्या काळात लोक घरातही सुरक्षित नाहीत आणि बाहेर रस्त्यावर आले तर रस्त्यावरही सुरक्षित नाहीत, असा संताप नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी पोलिसांसाठी राखीव असलेल्या येरवडय़ातील तीन एकर जागेबाबत लिखाण केले आहे. तत्कालीन पालकमंत्री दादांचा येरवडय़ातील मोक्याच्या जागी असलेल्या जमिनीवर डोळा होता. तीन एकर पोलिसांची जागा तत्कालीन पालकमंत्री दादांनी त्यांच्या संबंधातील बांधकाम व्यावसायिकाला देण्याचा घाट घातला होता. त्या जागेचा लिलाव करण्याच्या निर्णयाचा प्रयत्न केला होता. मात्र संबंधित जागा पोलिसांना घरे बांधण्यासाठी आरक्षित होती. त्यासंदर्भात आम्ही दादांना माहिती देत आक्षेप घेतला होता. मात्र तरीही त्यांनी ती जागा बिल्डरला देण्याचा घाट घातला होता. त्यामुळे जागेचा वाद कोर्टात गेला आहे. आजही ती मालमत्ता पोलिसांच्या नावे असून प्रॉपर्टी कार्डही पोलिसांच्या नावाने आहे.