महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेसचा मोर्चा, नाना पटोले पोलिसांच्या ताब्यात

महागाई, बेरोजगारी, ऑनलाईन पेपर त्याचबरोबर पेपरफुटी प्रकरणात आरोपींवर कारवाई करावी या तसेच तरुणांच्या विविध मागण्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने आज मोठा मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी विधान भवनावर जाणारा मोर्चा अडवून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह शेकडो युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी सरकारविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

महागाई, बेरोजगारी वाढत आहे. त्याचबरोबर सरकारने युवकांना रोजगार द्यावा, या मागणीसाठी मोर्चाने विधान भवनाला धडक दिली. मोर्चेकरी विधान भवनाला घेराव घालणार असल्याचे कळताच पोलिसांनी मोर्चा अडवला. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करत त्यांना ताब्यात घेतले. मोर्चात माजी मंत्री सुनील केदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त सहभागी झाले होते.

सरकार महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष करत आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीही केले जात नाही. सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. राज्यातील तरुणांचे, बेरोजगारीचे प्रश्न आम्ही सभागृहात मांडणार आहोत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.