स्थानिकांच्या विरोधानंतरही नाणार प्रकल्पाची रेटारेटी!

सामना प्रतिनिधी । मुंबई

कोकणातील नाणार येथे होणाऱ्या प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध नोंदविल्यानंतर हा प्रकल्प जनतेवर लादणार नाही, असे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आपला शब्द फिरवला आहे. नाणार प्रकल्प महाराष्ट्रात येणे ही भाग्याची गोष्ट असून या प्रकल्पाला विरोध होत असला तरी हा विरोध चर्चेने सोडवू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांना देऊन या प्रकल्पाची जबरदस्ती रेटारेटी सुरू केली आहे.

नाणार प्रकल्पाविरोधात या परिसरातील ग्रामपंचायतींनी ठराव केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी हे विरोधातील ठरावही मुख्यमंत्र्यांना देण्यात आले तेव्हा त्यांनी हा प्रकल्प स्थानिकांवर लादणार नाही असे आश्वासन दिले होते, मात्र त्यानंतरही या प्रकल्पाची रेटारेटी केंद्रातील सरकारने सुरूच केली आहे. सौदी अरेबियातील कंपनीशी झालेल्या करारानंतर बुधवारी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीआधी मुख्यमंत्र्यांकडे याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांशी याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले. मात्र आज पेट्रोलियम मंत्रालयाच्या मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परस्परच याविषयी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आश्वासन दिले. गुजरातमध्ये जाणारा रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रात आणल्याबद्दल धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानले.

जमीन अधिग्रहित होण्याचं दुःख मलाही ठाऊक – धर्मेंद्र प्रधान

मानसन्मान मुद्दा नाही, प्रतिष्ठेचा मुद्दा नाही, शेतकरी वर्गातून मी आलो आहे. जमीन अधिग्रहित करण्याचं दुःख मलाही माहिती आहे. मी खुल्या मनाने चर्चा करू पाहतोय. त्यावर मी सविस्तर बोलणार आहे, अशी प्रतिक्रिया धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली.

नाणार महाराष्ट्रात येणं ही भाग्याची गोष्ट – मुख्यमंत्री

नाणार प्रकल्प महाराष्ट्रात येणं ही भाग्याची गोष्ट आहे. काहींचा या प्रकल्पाला विरोध होत आहे, मात्र हा विरोध चर्चेने सोडवू. पेट्रोलियममंत्री सगळय़ात मोठी रिफायनरी महाराष्ट्रात आणत आहेत. या प्रकल्पामुळे मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. मला काटते नाणार रिफायनरी होणे हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. काही लोक या प्रकल्पाला विरोध करत आहेत, पण तो विरोध चर्चा करून सोडवू. संघर्ष नाही तर संवादाच्या माध्यमातून विषय संपवावे ही आमची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या