नांदेडमध्ये कोरोनाचा बळी, प्रशासन सतर्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेडमधील पीरबुऱ्हाननगरमध्ये राहणाऱ्या 64 वर्षीय रुग्णाचा आज दुपारी दीड वाजता शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णाचा पहिला अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर 28 एप्रिल रोजी त्याचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आला होता. मधुमेह, अस्थमा, रक्तदाब आदी आजार त्याला होते आणि गेली दोन दिवस तो गंभीर अवस्थेत होता.

नांदेडमध्ये 22 एप्रिल रोजी पीरबुऱ्हाननगरमध्ये जिल्ह्यातला पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला. त्याला मधुमेह, रक्तदाब व अस्थमाचा आजार होता. त्यामुळे वेगवेगळ्या दवाखान्यात त्याने दाखविले होते. त्यानंतर त्याला जास्त त्रास होऊ लागल्याने शासकीय रुग्णालयात त्यास दाखल करण्यात आले. तेथे त्याचा स्वॅब तपासण्यात आल्यानंतर 22 एप्रिल रोजी हा अहवाल पॉझिटीव्ह आला आणि नांदेडमध्ये पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्णाची नोंद झाली. त्यानंतर 28 एप्रिल रोजी त्याची दुसरी चाचणी घेण्यात आली. त्यात त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. मात्र अन्य आजारामुळे त्याची प्रकृती गंभीर होत गेली. आज दुपारी एक वाजता त्याचे रुग्णालयात निधन झाले. प्रशासनाने या वृत्तास दुजोरा दिला असून, या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार त्याच्या स्वॅबचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयातच ठेवण्यात आले होते. 14 दिवसानंतर त्याचा तिसरा अहवाल पाठविण्यात येणार होता. त्यापूर्वीच त्याचे निधन झाले आहे. दरम्यान पीरबुNहाननगर परिसरात तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.