सरकारी धान्याच्या आधारावर मेगा ऍग्रो कंपनीचा कारभार पुन्हा सुरू

विजय जोशी। नांदेड

शासकीय धान्य घोटाळ्यात गाजलेली मेगा ऍग्रो अनाज कंपनी आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या कंपनीमध्ये पूर्वीप्रमाणेच शासकीय धान्य येत आहे. मागे दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे असल्यामुळे सरकारी धान्याचे हे प्रकरण आणखीच गुंतागुंतीचे झाले असून याला पाठबळ कुणाचे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

19 जुलै 2018 मध्ये कृष्णूर तालुका नायगाव येथील औद्योगिक वसाहतीत कार्यरत मेगा ऍग्रो अनाज कंपनीत पोलिसांनी शासकीय धान्याचे आलेले 10 ट्रक जप्त केले. या प्रकरणाचा तपास सुरूवातीला पोलीस उपअधिक्षक विशाल खांबे यांच्याकडे होता. दुसऱ्या दिवशी पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी या कंपनीत भेट दिली आणि तेथे रचलेले सरकारी धान्याचे हजारो पोत्यांची पाहणी केली. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी नुरूल हसन यांच्याकडे देण्यात आला. सुरूवातीला या 10 ट्रकचे चालक या गुन्ह्याचे आरोपी झाले आणि इतर आरोपींना अटक करण्याच्या तयारीत नुरूल हसन असतांना अनेक घडामोडी झाल्या. कांही दिवसांतच पोलीस अधिक्षक मिणा यांची बदली झाली आणि या प्रकरणात गुंतलेल्या अनेकांनी या प्रकरणाला आपल्या परीने सारवासारव करण्यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नात त्यांना यश आले होते.

नुरूल हसन यांच्याकडून हा तपास काढून पुन्हा पोलीस उपअधिक्षक विशाल खांबे यांच्याकडे देण्यात आला. या संदर्भाने एकदा पोलीस महासंचालकांनी नुरूल हसन यांना या प्रकरणाची कागदपत्रे घेऊन मुंबईला बोलावले होते. त्यावेळी नुरूल हसन मोठी सुटकेस भरून कागदपत्र सोबत घेऊन गेले होते. पोलीस महासंचालकांनी या तपासासाठी नुरूल हसन यांना शाब्बासकी दिली होती.

त्यानंतर मात्र या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्यात आला. या गुन्ह्याची कागदपत्रे सीआयडीकडे देतांना जवळपास एक आठवडा लागला होता. सध्या हा तपास सीआयडीकडे आहे. प्राप्त माहितीनुसार सीआयडीने या प्रकरणातील सरकारी धान्याचा नमुना वैध वैज्ञानिक प्रयोग शाळेकडे तपासासाठी पाठवला आहे असे समजते .त्यात हे धान्य शासकीय आहे की, नाही याची विचारणा केली आहे. आता हा अहवाल कधी येईल याचा काहीच नेम नाही. नुरूल हसन यांनी हा तपास केला होता तेंव्हा नांदेडच्या क्षेत्रात सरकारी धान्याचा काळाबाजार कसा होतो हे सिद्ध करण्यासाठी पुरावे जमा करण्यास सुरूवात केली होती. पण मध्येच हा तपास सीआयडीकडे गेल्याने सर्व कांही शांत झाले.

शासकीय धान्याच्या व्यवहारात काम करणाऱ्या कांही लोकांनी सांगितले की, मेगा ऍग्रो अनाज कंपनी आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. जुलै 2018 मध्ये असणारी या कंपनीची परिस्थिती तशी नाही पण सरकारी धान्य कांही प्रमाणात येथे येतच आहे. या कंपनीने थेट शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करणे त्यांच्या कंपनीच्या बायलॉज प्रमाणे आवश्यक आहे. तरीपण आजही सरकारी धान्यावरच ही कंपनी सुरू झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या