पूरग्रस्त विचारताहेत, सरकार आहे कुठे? पालकमंत्री लंडनच्या पर्यटनात मग्न; गिरीश महाजनांनी काळोखात पूर पाहिला. कृषिमंत्री दत्ता भरणेंची रस्त्यावरूनच पाहणी

पालकमंत्री अतुल सावे हे लंडनला पुरस्कार पर्यटन करण्यासाठी गेले आहेत. मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी दिव्यदृष्टीने रात्रीच्या काळोखात पूरग्रस्त भागाची पाहणी केली. कृषिमंत्री दत्ता भरणे यांनीही महाजनांची कॉपी करत चार हात दुरूनच पूरग्रस्त भाग पाहिला. नागपूरला चार रस्ते पाण्याखाली जाताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जीव वरखाली झाला. नांदेड महापुरात बुडत असताना मुख्यमंत्री फडणवीस कुठे होते? त्यांच्या सरकारच्या संवेदना मेल्या आहेत का, असा सवाल पूरग्रस्त करत आहेत.

17 ऑगस्टपासून 19 ऑगस्टपर्यंत सलग तीन दिवस नांदेड जिल्हय़ात पावसाने थैमान घातले. राक्षसी पावसाचा सर्वात जास्त तडाखा मुखेड तालुक्याला बसला. प्रशासनाच्या मूर्खपणामुळे लोंडी धरणाच्या मागच्या बाजूला महाकाय पाणीफुगवटा झाला आणि त्यात हसनाळय़ासह सहा गावे बुडाली. नांदेडला महापुराची मगरमिठी पडलेली असताना पालकमंत्री अतुल सावे मात्र लंडनला पुरस्कार पर्यटन करत होते. झेंडावंदनाचा सोपस्कार आटोपून सावे लंडनला रवाना झाले, ते अद्यापपर्यंत परतलेले नाहीत. परिस्थिती गंभीर असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांना पाठवले. महाजन सायंकाळी नांदेडला आले. संतापजनक म्हणजे, रात्री आठ वाजता अंधारातच त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले

अतुल सावे, गिरीश महाजनांनंतर कहर केला कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी. दत्ता भरणे बुधवारी सायंकाळी नांदेडला आले आणि मुखेडला न जाता हदगावला गेले. पूरग्रस्त भागाची रस्त्यावरूनच पाहणी करून त्यांनी नांदेडकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचेच काम केले. या मंत्र्यांनी येऊन काय दिवे लावले? त्यापेक्षा आले नसते तर प्रशासनाला निदान मदतकार्य वेगात करता आले असते, अशी संतप्त प्रतिक्रिया या भागात उमटली आहे.