रोहयो योजनेचा मोबदला मिळेना, मजुरांवर उपासमारीची वेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील चार महिन्यापासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहिरीच्या व अन्य योजनेचे कामे पुर्ण केले तरी कामाचा मोबदला मिळत नसल्यामुळे लाभार्थी व रोहयो अंतर्गत कामावरती असलेल्या मजूरांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.

सिचंन विहीर व अन्य काम करून चार महिने उलटून गेले तरी कामाच्या मोबदल्यासाठी प्रतिक्षा करावी लागत असल्याने लाभार्थी व मजूरवर्ग बॅकेत चकरा मारून वैतागला आहे. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असून पुढील काळात रोहयो अंतर्गत होणार्‍या कामाचा बोजवारा उडण्याची शक्यता वाढली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत काम करणार्‍या सर्वच मजुरांना त्याचा मोबदला अपेक्षित वेळेत मिळावा या उद्देशाने शासन स्तरावर दोन महिन्यापूर्वी नुकताच सकारात्मक निर्णय घेण्यात आला होता यात गाव स्तरावरील ग्राम रोजगार सेवकाच्या अधिकारात वाढ करीत त्यांच्या पातळीवर मजुरांचा हजरीपट तयार करून घेऊन या मजुरांचे आठवडाभरातच त्यांच्या कामाचा मोबदला बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला होता परंतु हे निर्णय केवळ कागदावरच राहिला आहे.

केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या सहकायार्ने गावातील मजुरांना गावातच हाताला कामे मिळावे यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना गावस्तरावर चालू आहे परंतु या योजनेतून सिंचन विहीर, फळबाग, शेततळे, घरकुल, मेरी मिट्टी मेरा देश, पेवर ब्लॅक, अलघड दगडी बांध, टी एम सी गुरे प्रतिबंधक चर, वृक्ष लागवड संरक्षण, शाळा संरक्षण भिंत, सिमेंट रस्ते, पाणंद रस्ता यासह गावस्तरावर या योजनेअंतर्गत रोहयो अंतर्गत मजुरांना कामे मिळतात.

हदगाव तालुक्यात 125 ग्रामपंचायत असुन 71 ग्रामपंचायतीमध्ये कामे चालू आहेत त्यावर 3000 मजूर दर रोज काम करतात त्यात 277 कामे चालू असून त्यामध्ये सर्वाधिक सिंचन विहिरीचे 173, घरकुल 76, पांदण रस्ते 6 व सिमेंट रस्ते या 5 कामाचा समावेश असुन ही कामे चालू आहेत. रोहयो अंतर्गत काम केलेल्या मजुराचे जवळपास 5 कोटी रुपये शासनाकडून येणे बाकी असून संबंधित मजूर मागील चार महिन्यापासून बँकेत जाऊन आपल्या कष्टाचे पैसे बँक खात्यात जमा झाले का याची चौकशी करून हवालदित आहेत.

परंतु गेल्या चार महिन्यापासून मजुरांना त्यांचा मोबदला मिळत नसल्यामुळे मजूर कामावर येत नाहीत त्यामुळे या योजनेला लवकरच बंद पाडण्याचा डाव नेमका कोणाचा आहे? हे कळायला मार्ग नाही. सरकार तर म्हणते नागरिकांना गावातच हाताला कामे मिळणार, परंतु कामे करूनही मजुरांना चार महिन्यापासून पैशासाठी पंचायत समितीच्या कार्यालयाला हेलपाटे मारावे लागत असल्यामुळे मजूर चार महिन्यापासून हवालदिल असून रोजगार हमी योजनेच्या गरीब मजुरांना त्यांच्या कष्टाचा मोबदला कधी मिळणार याकडे हजारो मजुरांचे लक्ष लागून आहे.

मी सिंचन विहिरीचे मे 2023 मध्ये काम पूर्ण करून सुद्धा मला कामाचे पैसे अद्यापही मिळाले नाही मजुरांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले का? म्हणून नाहक बँकेच्या चकरा माराव्या लागत आहेत. मजुरीचे पैसे मिळत नसल्याने मजूर कामावर येत नसुन मजुराचे पोट कसे भरावे. तुपाशी असलेल्या केंद्र व राज्य शासनाने मागील चार महिन्यापासून हवालदित असलेल्या मजुरांचा व त्याच्या कुटूंबाचा विचार करावा व मजुराच्या कामाचे पैसे त्वरित देऊन रोहयोच्या मजुरांची होत असलेली हेळसांड थांबवावी, अशी मागणी लाभार्थी मारोतराव कदम, निवळा यांनी केली आहे.