कलेक्टरची मुले गिरवताहेत झेडपीच्या शाळेत धडे, नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी शाळा टाळून समाजापुढे ठेवला आदर्श

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी आपल्या जुळ्या मुलांना घेऊन 15 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयापासून तीन किलोमीटर अंतरावरील टोकर तलाव या खेडय़ातील जिल्हा परिषद शाळेत पोहोचल्या आणि मुलांचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर तेथील अंगणवाडीत दोघांचाही प्रवेश घेऊन त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

बहुतांश पालक पाल्यांसाठी इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांना पसंती देत असताना आदिवासीबहुल भागातीलच सरकारी शाळा निवडून डॉ. सेठी यांनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे. शाळांचा दर्जा सुधारण्यासाठीही हा पायंडा महत्त्वाचा ठरणार आहे.

आदिवासीबहुल भागात कार्यरत अधिकारी तर मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था मोठय़ा शहरातच करतात. असे असताना नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी शुकर व सबर या आपल्या जुळ्या मुलांसाठी टोकर तलाव येथील जिल्हा परिषदेची अंगणवाडी निवडली. जिल्हाधिकारी कार्यालयापासून ही शाळा तीन किलोमीटर अंतरावर आहे.

…म्हणूनच इतर शाळांचा विचार केला नाही

टोकर तलावच्या अंगणवाडी सेविकेने तेथील मुलांसाठी उत्तम अशी झोळी तयार केल्याचे मी याआधी बघितले होते. तसेच पूर्वी भेट दिली तेव्हा अंगणवाडीचा चांगला दर्जा पाहून मला आनंद झाला. माझ्या मुलांनीही अडचणींवर मात कशी करायची हे त्यांच्याकडून शिकावे असे वाटत होते. या अंगणवाडीतच मुलांना घालायचे हे ठरवलेले होते. येथे चांगल्या सुविधा असल्याने इतर शाळांचा विचार करण्याची गरजच नव्हती. विशेष म्हणजे शाळा व अंगणवाडी एकाच आवारात आहेत. मुलांना पोहोचवण्याच्या निमित्ताने माझे येथील सुविधांवर तसेच जिह्यातील शाळा, गाव सुधारणांवर लक्ष राहील, अशी प्रतिक्रिया डॉ. सेठी यांनी दिली.

15 सप्टेंबरला सकाळी त्या मुलांना घेऊन शाळेत आल्या, त्यांचा वाढदिवस शाळेतच साजरा केला. त्यानंतर प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली. अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी मुलांना खाऊ आणि गणवेश दिला.