नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत घातलं, राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव

सध्या आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी पालकांची धडपड सुरू असते. इंग्रजी शाळेत पाल्यांना शिकवण्यासाठी पालक लाखो रुपये खर्च करण्यास तयार असतात. यामुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र, नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे.

त्यांनी आपल्या जुळ्या मुलांचा प्रवेश शहरातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, टोकरतलाव येथील अंगणवाडीत केला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुलांच्या प्रवेशासाठी त्या स्वतः शाळेत गेल्या, त्यावेळीचा त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

डॉ. मिताली सेठी यांनी आपल्या तीन वर्षांच्या ‘सबर’ आणि ‘शुकर’ या जुळ्या मुलांना टोकरतलाव येथील अंगणवाडीत दाखल केले आहे. या अंगणवाडीतील सेवा आणि शिक्षिकांचे विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम पाहून त्या खूप प्रभावित झाल्या.

सरकारी शाळांबद्दल समाजामध्ये विश्वास निर्माण व्हावा आणि शिक्षण क्षेत्रात चांगले बदल घडावेत, या उद्देशानेच त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे डॉ. मिताली सेठी यांनी सांगितले. त्यांचा हा निर्णय इतर पालकांसाठी एक चांगला आदर्श ठरला आहे.