आदर्शवतच! नांदुर्गा येथे पंधरा वर्षापासून दारूबंदी

गणेश कुंभार । नांदुर्गा

‘संसार उद्ध्वस्त करते दारू, बाटलीस स्पर्श नका करू’ अशा बऱ्याच प्रकारच्या म्हणी प्रसार माध्यमातून जनहितार्थ समाजामध्ये पसरविल्या जातात. दारूमुळे समाजावर होणाऱ्या दुष्परिणाची उदाहरणे पाहता प्रशासनाकडून दारूबंदीसाठी कठोर कार्यवाहीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र वास्तविक पाहता ही तरतूद कितपत अंमलात आणली जाते ही संशोधनाची बाब आहे. याला अपवाद म्हणून बोटावर मोजण्याइतक्याच गावाचा उल्लेख करता येईल त्यामध्ये नांदुर्गा गावातील महिलांचे कार्य उल्लेखनीय आहे.

औसा तालुक्यातील नांदुर्गा हे गाव 1993 साली झालेल्या प्रलयकारी भुकंपानंतर 1996 साली नांदुर्गा भाग 1, नांदुर्गा भाग 3 व नांदुर्गा तांडा अशा तीन ठिकाणी कायमस्वरूपी वसविण्यात आले. त्यामध्ये भाग 1 मध्ये सर्वाधिक लोकवस्ती आहे. या गावात दोन ते तीन अवैध दारू दुकाने राजरोसपणे चालायची. त्यामुळे गावात तळीरामाची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. याचा त्रास गावातील महिला वर्गाला मोठ्या प्रमाणात होत होता. हे वास्तव पाहता गावातील वनिता कुलकर्णी, शालुबाई कुंभार, सुसाबाई चव्हाण, प्रभावती पाटवदकर, इंदुबाई श्रीखंडे आदी महिलांनी एकत्र येऊन 2003 साली भरारी महिला मंडळाची स्थापना केली व गावातील दारू विक्रेत्याना दारू विक्री पासून परावृत्त करीत दारू दुकाने बंद करण्याची विनंती केली. या विनंतीचा दारू विक्रेत्यावर कांहीच परिणाम झाला नाही उलट दारू विक्रेत्याकडून महिलांना त्रास होऊ लागला. त्यानंतर महिलांनी किल्लारी पोलिसांची मदत घेत गावातील दारू दुकानात जाऊन तेथील दारूच्या बाटल्या पोलिसांसमक्ष रस्त्यावर फेकून दिल्या. असाच प्रकार गावात दोन ते तीन वेळेस करण्यात आला. त्यानंतर पोलिसाकडुन दारू विक्रेत्यावर दंडात्मक कार्यवाही करून त्यांना अटक करण्यात आली. परिणामी दारू विक्रेत्यांना चपराक बसला तेव्हापासून आजपर्यत गावातील दारूबंदीला पंधरा वर्षे पूर्ण झाले आहेत. त्याबरोबरच भरारी महिला मंडळाच्या महिलांनी गावातील कौटुंबिक कलह व तंटे मिटविण्यासाठी कौटुंबिक सल्ला केंद्राचेही उल्लेखनीय कार्य गावपातळीवर केले आहे. तसेच गावातील महिलांना बचतीचे महत्त्व पटवून देत गावात चार ते पाच बचत गटाची स्थापना करून गावातील गरजू महिलांना कर्जाचे वाटपही करण्यात आले असल्याची माहिती ‘दै.सामना’शी बोलताना गावातील महिलांनी दिली.