
अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात एनसीबीच्या व्हिजिलन्स विभागाने अहवाल तयार केला असून त्यात समीर वानखेडे यांनी आर्यन खान याला अडकवण्यासाठी षडयंत्र रचल्याचा खुलासा त्यात करण्यात आला आहे. एनसीबीच्या व्हिजिलन्स विभागाने 11 मे रोजी सीबीआयला आपला अहवाल सोपवला होता. या प्रकाराच्या तपासाची सुरुवात 25 ऑक्टोबर 2021 रोजी झाली होती. व्हिजिलन्स विभागाने समीर वानखेडे, अधीक्षक विश्वविजय सिंह आणि इंटलिजन्स अधिकारी आशीष रंजन यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
ऑक्टोबर 2021 मधील हे प्रकरण आहे. 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझवर धाड टाकली होती. ड्रग्ज प्रकरणात केलेल्या या कारवाईत आर्यन खानसह 20 जणांना अटक करण्यात आली होती. तेव्हाचे ‘एनसीबी’चे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. ‘एनसीबी’ने आर्यन खानला जवळपास एक महिना कोठडीत ठेवले होते, पण पुराव्याअभावी आर्यन खानची सुटका झाली होती.
पण, धाडीत अनेक गोष्टींमध्ये अफरातफर असल्याचं एनसीबीने अहवालात म्हटलं आहे. या धाडीत 27 संशयितांची यादी बनवण्यात आली होती. त्यानंतर ती यादी घटवून 10वर करण्यात आली. त्यातील अनेकांना अंमली पदार्थ सापडूनही कोणत्याही कारवाईशिवाय सोडण्यात आलं. यात सिद्धार्थ शहा नावाच्या एका ड्रग तस्कराचाही समावेश होता. मग पकडलेल्या संशयितांना के. पी. गोसावी नावाच्या एका व्यक्तिच्या गाडीत आणण्यात आलं. गोसावी हा एनसीबी अधिकारी असल्याचं भासवून त्याच्यासह सानविल डिसोझा नावाच्या व्यक्तिने आर्यन खान याला अडकवण्यासाठी शाहरुख याच्याकडून 25 कोटी रुपये वसूल करण्याचं षडयंत्र रचलं. आर्यन याला यात अडकवण्याची धमकी देत 18 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली.
के. पी. गोसावी याने टोकन म्हणून त्यातील 50 लाख रुपये घेतले. यातील काही रक्कम नंतर परत करण्यात आली. हे सगळं षडयंत्र समीर वानखेडे यांच्या सांगण्यावरून झाला, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तसंच, वानखेडे यांनी केलेले परदेश दौरे, खरेदी केलेली महागडी घड्याळं यांचा स्रोत सांगण्यात असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याला विसरत आरोपींकडून आर्थिक फायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत सीबीआयने वानखेडे आणि अन्य अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.




























































