मोदी केरळच्या मुख्यमंत्र्यांना नियंत्रित करतात, ते भाजपची बी टीम; राहुल गांधी यांचे पिनरई विजयन यांच्यावर टिकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळमध्ये दोन प्रमुख आघाड्या सत्ताधारी LDF आणि मुख्य विरोधी गट UDFएकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. केरळच्या या राजकारणात भाजपची बी-टीम हा मुद्दा गाजत आहे. या आघाड्या राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या भाजपशी एकमेकांची तुलना करत आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मोदी केरळच्या मुख्यमंत्र्यांना नियंत्रित करतात, ते भाजपची बी टीम आहेत, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधींनी पिनराई विजयन यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.

केरळच्या पतनमथिट्टा येथे एका निवडणूक सभेत, राहुल गांधींनी एक गंभीर आरोप केला. ते म्हणाले LDF ला भाजपचा पूर्ण पाठिंबा आहे. केरळमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, LDF चा चेहरा आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF ला भाजपची बी-टीम असे संबोधले होते. त्यानंतर राहुल गांधींनी विजयन यांच्यावर पलटवार केला आहे.

राहुल गांधींनी सत्ताधारी डाव्या सरकारवर तीव्र टीका केली आणि म्हटले, LDF केरळमध्ये डाव्या आघाडीसारखे वर्तन करत नाही… हे आता डावे सरकार राहिलेले नाही, तर कॉर्पोरेट्सकडून निधी मिळवणारे सरकार बनले आहे. आम्ही येथे निवडणुकीत LDF विरुद्ध लढत आहोत, ज्यांना भाजपचा पूर्ण पाठिंबा आहे. एका बाजूला UDF आहे आणि दुसऱ्या बाजूला LDF आणि भाजप यांची युती आहे. केरळच्या निवडणुकीत भाजपचा एक ‘छुपा हात’ कार्यरत आहे. त्यांना येथे UDF नको आहे. त्यांना हे चांगलेच ठाऊक आहे की, संपूर्ण देशात त्यांना आव्हान देणारी एकमेव शक्ती म्हणजे काँग्रेस पक्ष आहे. भाजपला हे ठाऊक आहे की, जर दिल्लीत त्यांची सत्ता असेल, तर केरळमधील कोणतेही LDF सरकार पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणाखाली असेल, असे ते म्हणाले.

याचा पहिला पुरावा म्हणजे, जे लोक भाजपशी लढा देतात, त्यांच्यावर भाजपद्वारे हल्ले केले जातात आणि त्यांना धमक्या दिल्या जातात. माझ्यावर स्वतःवरही हल्ला झाला आहे आणि माझ्याविरुद्ध ३६ खटले दाखल आहेत. मात्र, केरळच्या मुख्यमंत्र्यांवर भाजपद्वारे कोणताही हल्ला केला जात नाही. सत्य हे आहे की, नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली आहेत आणि हे सर्वांनाच ठाऊक आहे. अगदी त्याचप्रमाणे, नरेंद्र मोदी केरळच्या मुख्यमंत्र्यांवर नियंत्रण ठेवतात. पिनराई विजयन भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

रविवारी पालक्काड येथे दिलेल्या भाषणात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘शबरीमला सुवर्ण चोरी’च्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल राहुल यांनी त्यांच्यावर टीकाही केली. प्रत्येक भाषणात ते मंदिरे आणि धर्माबद्दल बोलतात; पण नवल म्हणजे, शबरीमलामध्ये नक्की काय घडले, हे मात्र ते विसरले. डाव्या आघाडीच्या नेत्यांनी अय्यप्पा मंदिरातील सोने काढून घेतले आणि त्याजागी पितळ ठेवले, ही गोष्ट ते विसरले, असे राहुल म्हणाले.