
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱया भाजपचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोर शिवरायांचा पुतळा उभारण्यास मोदी सरकारने नकार दिला आहे. ‘हे आमच्या धोरणात बसत नाही’, असे संतापजनक आणि चीड आणणारे उत्तर रेल्वे राज्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहे. मुख्य म्हणजे, शिवरायांच्या पुतळय़ासाठी नियम सांगणाऱया रेल्वेने गुजरातच्या एकता नगर स्टेशनवर मात्र सरदार वल्लभभाई पटेलांचे एक नव्हे, तर दोन पुतळे उभारले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोर शिवरायांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत हे गेल्या आठ वर्षांपासून करत आहेत. याबाबत त्यांनी लोकसभेत वेळोवेळी आवाज उठवला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 10 फेब्रुवारी रोजी शून्य काळात त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला दहा महिन्यांनंतर रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी उत्तर दिलं आहे.
तो पुतळा कुठे गायब झाला?
मध्यंतरी शिवरायांचा एक पुतळा छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या मागच्या बाजूस उभारण्यात येत होता. पुतळा दर्शनी भागातच उभारला जावा, असे आम्ही सांगितले. त्यानंतर संबंधित पुतळा तिथून गायब करण्यात आला. त्याचे पुढे काय झाले हे कुणीच सांगायला तयार नाही, अशी बाबही सावंत यांनी समोर आणली.
रेल्वे राज्यमंत्र्यांनी अरविंद सावंत यांना 27 नोव्हेंबर रोजी पत्र पाठवून दिलेलं उत्तर चीड आणणारं आहे. ‘आपल्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही चौकशी केली. त्यानुसार टर्मिनस मुख्यालयासमोर अशाप्रकारे पुतळा उभारणे हे प्रचलित पद्धती आणि धोरणांच्या कक्षेत बसणारे नाही’, असे या पत्रात नमूद केले आहे.
पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा
पेंद्राचे उत्तर शिवरायांचा अवमान करणारे आहे, असे नमूद करत अरविंद सावंत यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. पुढच्या आठवडय़ात याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहे. त्यांनी यात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी विनंती करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांच्या पुतळय़ाला रेल्वे स्थानकात परवानगी मिळते, मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला का दिली जात नाही? ती बाब अखत्यारीत येत नाही असे रेल्वे मंत्रालय कसे बोलू शकते? हा दुजाभाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत. ते फक्त महाराष्ट्राचे नाहीत. त्यांचा अवमान पेंद्र सरकार करते हा संपूर्ण देशाचा आणि महाराष्ट्राचा अवमान आहे, असे अरविंद सावंत म्हणाले.
फडणवीस म्हणाले होते, आराखडय़ात पुतळा आहे!
शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी 14 जुलै 2025 रोजी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याबाबत राज्याने ठराव करून पेंद्राला पाठवावा अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर या स्टेशनचा पुनर्विकास केला जाणार. भव्य आणि आयकॉनिक स्टेशन होणार आहे. त्याचा आराखडा तयार आहे. त्यात शिवरायांचा पुतळा समाविष्ट आहे. त्यामुळे पेंद्राकडे प्रस्ताव पाठवण्याची आवश्यकता नाही, असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
स्टेशनच्या नावांबाबतही खोटारडेपणा
मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या ब्रिटिशकालीन नावांबाबत भाजपचा खोटारडेपणाही अरविंद सावंत यांनी समोर आणला. लोकसभा निवडणुकीआधी मुंबईत भाजपने सर्वत्र हार्ंडग्ज लावले. मरीन लाइन्सचे मुंबादेवी, चर्नीरोडचे गिरगाव, ग्रँटरोडचे गावदेवी, मुंबई सेंट्रलचे नाना शंकरशेट, लोअर परळचं वरळी, सँडहर्स्ट रोडचं डोंगरी, कॉटन ग्रीनचं घोडपदेव, करीरोडचं लालबाग अशी नावे बदलल्याचा दावा करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात पेंद्राने हे बदल अजूनही केलेले नाहीत याकडे अरविंद सावंत यांनी लक्ष वेधले.
गुजरातसाठी नियम नाहीत का?
रेल्वे स्टेशनवर पुतळय़ाची उभारणी धोरणात बसत नाही, असे सांगणाऱ्या रेल्वेने गुजरातमध्ये मात्र हा नियम खुंटीला टांगला आहे. त्यावर शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी बोट ठेवलं. गुजरातमधील केवडिया स्टेशनचं एकता नगर असं नामांतर करण्यात आलं आणि त्या स्टेशनसमोर सरदार वल्लभभाई पटेलांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. एवढंच नाही, स्टेशनच्या आतही सरदार पटेलांचा पुतळा आहे. शिवाय स्टेशनसमोरच्या मुख्यालयाच्या इमारतीवर सरदार पटेलांचे म्युरल लावण्यात आले आहे. त्याची छायाचित्रे दाखवत मोदी सरकारकडून त्याला परवानगी दिली जाते, मग शिवरायांच्या पुतळय़ाबाबत वेगळे नियम का? तिथे नियमांची चौकट आडवी का येते, असा सवाल अरविंद सावंत यांनी केला.






















































