इम्रान खान संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पुन्हा आळवणार कश्मीरचा राग

551

पाकड्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच असल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान 23 सप्टेंबर रोजी होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पुन्हा एकदा कश्मीरचाच राग आळवणार आहेत. हिंदुस्थान सरकारने कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर पाकिस्तानकडून सतत विविध माध्यमांतून कुरापती काढणे सुरूच आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह टेक्सासमधील ह्युस्टन या ठिकाणी रविवारी संयुक्त सभेला संबोधित करणार आहेत.

इम्रान खान यांच्या भेटीआधी हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांच्या सभेत ट्रम्प आणि मोदी भाषण करतील. याशिवाय मोदी आणि ट्रम्प यांच्यात एक बैठकही होणार असून या बैठकीत हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या संबंधांबाबत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. रविवारी सायंकाळी मोदी न्यूयॉर्कमध्ये पोहोचणार असून या ठिकाणी 50 हजार हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांची सभा होणार आहे.

  • हिंदुस्थान कश्मीर मुद्दय़ावर चर्चा करणार नसून एक जबाबदार देश म्हणून विकास, शांतता आणि सुरक्षा हे विषय केंद्रस्थानी ठेवणार असल्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी म्हटले आहे. दहशतवादाच्या मुद्यावरही हिंदुस्थान आपली बाजू मांडेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या विमानांना पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद केली होती. एखाद्या राष्ट्राच्या प्रमुखासाठी एखादा देश अशा प्रकारे आपली हवाई हद्द बंद करतो. हे पहिल्यांदाच घडले असून लवकरच पाकिस्तानला आपला मूर्खपणा कळून चुकेल, असेही गोखले यांनी सांगितले.

मोदी, इम्रान भाषणात काय बोलणार?

नरेंद्र मोदी आणि इम्रान खान हे दोघेही संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण करणार आहेत. 27 सप्टेंबर रोजी मोदी भाषण करतील तर त्याच दिवशी दुपारी इम्रान खान आपला मुद्दा भाषणातून मांडणार आहेत. इम्रान खान यांनी यापूर्वीच आपण कश्मीर मुद्द्यावर बोलणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे, तर न्यूयॉर्कमधील हिंदुस्थानी दूतावासाने मोदी हे 370 कलमाबद्दल बोलणार नसून कश्मीरमधील सद्यस्थितीचा पाकिस्तान कसा फायदा उचलत आहे आणि त्या ठिकाणचे वातावरण कसे दूषित करत आहे याबाबत बोलणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पाकिस्तान खालच्या थराला जाऊ शकतो!

पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत कश्मीर मुद्दा पुन्हा उकरून काढू शकतो. त्यासाठी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन हिंदुस्थानवर टीका करू शकतो, परंतु हिंदुस्थान आपली पातळी सोडणार नाही. आम्ही आमचा स्तर उंचच ठेवणार अशा शब्दांत हिंदुस्थानचे संयुक्त राष्ट्रांमधील स्थायी प्रतिनिधी सैयद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. न्यूयॉर्कमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आपली प्रतिक्रिया द्या