मोदींची आज पंच्याहत्तरी; खुर्चीवर कायम

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (17 सप्टेंबर) वयाची 75 वर्षे पूर्ण करीत आहेत. पंच्याहत्तरी ओलांडल्यानंतर मोदी सत्तापदी राहणार की भाजपच्या नव्या पिढीपुढे वेगळा आदर्श ठेवणार याविषयी उत्सुकता आहे. मात्र तूर्त तरी ते खुर्चीवर कायम असून पंतप्रधान म्हणूनच वाढदिवस साजरा करत आहेत.

2014 साली केंद्रात भाजपचे बहुमताचे सरकार आले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी विराजमान झाले. मोदींच्या उदयाबरोबर भाजपही बदलू लागला. पक्षात अनेक नवे पायंडे पडले. लालकृष्ण आडवाणी, यशवंत सिंह, शांता कुमार यांच्यासह भाजपमधील त्या वेळच्या जवळपास सर्व ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारले गेले. वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या नेत्यांनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत जावे, असा संदेश अप्रत्यक्ष दिला गेला. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या या अलिखित नियमाचे मोठे कौतुक झाले होते.

आदेश कोण देणार?

आता खुद्द नरेंद्र मोदी हेच 75 वर्षांचे होत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीच्या चर्चेने जोर धरला आहे. भाजपमध्ये सध्या मोदी हेच सर्वोच्च नेते आहेत. त्यांना आदेश देणारे कोणी नाही. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच वयाचा विषय निकाली काढला. ‘‘संघाने कोणालाही निवृत्त होण्यास सांगितले नाही,’’ असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता राहायचे की जायचे हा निर्णय मोदींनाच घ्यावा लागणार आहे. मोदी हे धक्कातंत्रासाठी ओळखले जातात. त्यामुळे वाढदिवशी ते काही धक्का देतात का हे पाहावे लागेल.