दादांनी अंधभक्तांनाही लाजवले म्हणे, मोदी ही दैवी शक्ती!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचे अवतार आहेत असे भाजप नेते आजवर म्हणायचे मात्र, आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही तो साक्षात्कार झाला. पंतप्रधान मोदी जगात लोकप्रिय आहेत. अशी माणसं सतत जन्माला येत नसतात, ती दैवी शक्ती असते, अशी स्तुतीसुमने अजित पवार यांनी मोदींवर उधळत अंधभक्तांनाही लाजवले.

महायुतीच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक खडकवासला मतदारसंघात आयोजित केली होती. या बैठकीत अजित पवारांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने उधळताना भाजप नेत्यांना लाजवेल असे भाषण ठोकले. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, जगात देशाची शान वाढविण्याचे काम मोदींनी केले. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींना ज्या अमेरिकेने व्हिसा नाकारला होता. त्यानंतर मोदींनी असा काही करिश्मा केला की पंतप्रधान झाल्यानंतर अमेरिकेनेच रेड कार्पेट टाकून मोदींचे स्वागत केले. मी राजकारणात अनेक नेते पाहिले पण मोदींसारखा नेता नाही. मोदी अहोरात्र काम करतात. अशी माणसं सतत जन्माला येत नसतात. ती दैवी शक्ती असते, दैवी देणगी असते. मोदी हे दैवी देणगी असणारे नेते आहेत.