सत्ता थरथर कापतेय! विश्वंभर चौधरींचा ‘सर्जिकल स्ट्राइक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-fail-lok sabha

सामना ऑनलाईन,मुंबई

आलोक वर्मा नावाच्या प्रामाणिक अधिकाऱ्यासमोर नरेंद्र मोदी नावाचा महापुरुष… सर्वशक्तिमान पंतप्रधानही थरथर कापत आहे, असा जबरदस्त घणाघात राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी यांनी केला. ‘फेसबुक’वरून चौधरी यांनी केलेल्या या जहरी टीकेवर नेटकऱ्यांनी पाठिंब्याच्या पोस्ट टाकून मोदींच्या राजवटीविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.

फेसबुकवर चौधरी लिहितात-सत्ता बनताना पाहिल्या आहेत, बिघडताना पाहिल्या आहेत. पण सत्ता थरथर कापताना पाहण्याचा योगही आपल्याला आला आहे. सुप्रीम कोर्टाने आलोक वर्मांना पुन्हा पदावर आणल्यानंतर 48 तासांच्या आतच वर्मांना मोदी अध्यक्ष असलेल्या समितीने काढून टाकले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पंतप्रधानांनी पालन केले पाहिजे याचे मोदींचे भानही सुटले आहे. कोणी असे म्हणेल की, ही सत्तेची मस्ती असते. असेलही पण त्यापेक्षा जास्त आहे ती भीती! खरे तर आलोक वर्मा आजपासून दहा दिवसांत निवृत्त होणारच होते, मग केवळ दहा दिवसांसाठी पंतप्रधान का घाबरत आहेत?

  • नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वातून वर्मांना उत्तर देण्याची, स्वतःची बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी होती. तीही न देण्याइतकी सत्ता घाबरलेली आहे.
  • मोदीजींच्या सत्तेचा दिवा विझण्यापूर्वी मोठा होत आहे. ते 2019 मध्ये होईलच, असे निरीक्षण नोंदवून चौधरी पुढे लिहितात,  महत्त्वाचा मुद्दा आहे तो असा की, एक प्रामाणिक अधिकारी सर्वसत्ताधीशाला भयकंपित करू शकतो हा संदेश भविष्यातील राज्यकर्ते लक्षात घेतील.

राफेल प्रकरणात एक एफआयआर वर्मांनी केला असता तर…

एकच कारण दिसतं. मोदींना अशी भीती वाटत असावी की राफेल प्रकरणात एक एफआयआर जरी वर्मांनी दाखल केला असता तरी या सरकारचं वस्त्रहरण झालं असतं असा जोरदार प्रहार करीत चौधरी पुढे नमूद करतात, एवढय़ा एकाच कारणासाठी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या ‘समिती’ नावाच्या एका फटीतून मोदीजींनी पलायन केलं.