
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या सावकार मित्रांकडील कोळसा खरेदी करण्यासाठी राज्यांवर दबाव टाकतात. देशातील कोळशाच्या तुलनेत चारपट, पाचपट महाग असलेला आयात कोळसा घेतला नाही तर कोल इंडियातून पुरवठा बंद करू अशी धमकी देतात, असा आरोप तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला.
देशात 100 वर्षे पुरेल इतकी कोळशाची नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. त्यातून दरवर्षी 5 ते 10 हजार मिलियन टन कोळसा काढला जातो. अजूनही बऱयाच ठिकाणी कोळशाचे साठे सापडत आहेत. देशात इतकी नैसर्गिक साधनसंपत्ती असताना तुम्ही परदेशातून कोळसा आयात का करता? तुमची काय अडचण आहे, असा सवाल चंद्रशेखर राव यांनी केला.
आम्ही तुमची व्यक्तिगत निंदा करत नाही. तुमच्या कोळसा आयात धोरणामुळे आम्ही तुम्हाला दोषी ठरवत आहोत. तुम्ही दोषी नाही, तुमची बाजू सत्य आहे तर उत्तर द्या. मनात येईल ते करा, आम्ही असले आदेश पाळणार नाही. आमचा स्वतःचा कोळसा आहे तर आम्ही तुमच्याकडून विकत का घ्यायचा, असा सवाल मुख्यमंत्री केसीआर यांनी पंतप्रधान मोदींना केला.
पंतप्रधान सेल्समनचे काम करतात
हिंदुस्थानात 4 हजार रुपयांमध्ये एक टन कोळसा मिळतो. मोदींचा कोळसा 25-30 हजार रुपये प्रतिटन आहे. चारपट, पाचपट किंमत देऊन कोण खरेदी करेल? मोदी पंतप्रधानांचे काम करत नाहीत, तर सावकार मित्रांसाठी सेल्समनचे काम करतात, असा टोला चंद्रशेखर राव यांनी लगावला.

























































