मोदी म्हणतात, जनतेचे दु:ख मला समजते, वेदनाही जाणवतात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शंभर वर्षानंतर साथीच्या आजाराची आपत्ती  जगावर आली आहे. कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. देशातील अनेक लोक या संकटातून जात आहेत. जनतेचे दुःख मला समजते. त्यांच्या वेदना मलाही जाणवतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. दरम्यान, देशाच्या ग्रामीण भागात कोरोना झपाटय़ाने पसरतोय. हा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. जनतेनेही नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पंतप्रधान काय म्हणाले?

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी सर्व सरकारे, लष्कर, वैज्ञानिक, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाविरुद्धची लढाई हिंदुस्थान हरलेला नाही. ही लढाई देशवासीय नक्कीच जिंकतील, असा मला विश्वास आहे.

ज्यांनी आपल्या जिवलगांना गमावले त्यांच्या वेदना मी समजू शकतो. जनतेचे दुःख मला समजते, त्यांच्या वेदनाही जाणवतात.

जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न

कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी पर्याय आहे. आतापर्यंत देशभरात 18 कोटी डोस लस देण्यात आली आहे. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याचा केंद्र आणि राज्य सरकारांचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत, असे मोदी म्हणाले.

ग्रामीण भागात कोरोना वेगाने पसरतोय. हा संसर्ग रोखण्यासाठी सर्व राज्य सरकारांचा प्रयत्न सुरु आहे. जनतेमध्येही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जागृती केली जात आहे. ग्रामीण जनतेने सहकार्य करावे. मास्कचा योग्य वापर, दो गज दूरी आणि सॅनिटायझर ही त्रिसूत्री कायम लक्षात ठेवावी.