मणिपूरवर पंतप्रधान मोदी 10 ऑगस्टला मौन सोडणार, अविश्वास प्रस्तावावर 8 ते 10 ऑगस्टला चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

मणिपूर मुद्दय़ावरून विरोधकानी नरेंद्र मोदी सरकार विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर 8 ते 10 ऑगस्ट अशी चर्चा होणार असून पंतप्रधान या चर्चेला 10 ऑगस्ट रोजी उत्तर देणार आहेत.

लोकसभा सभापतींनी अविश्वास प्रस्ताव स्वीकारला असला तरी त्यावर चर्चा कधी होणार, हे सरकारने आजवर गुलदस्त्यात ठेवले होते. आज सरकारने याबाबतचा संभ्रम संपवला.

दिल्ली सेवा अधिकार विधेयक सादर;

लोकसभेत प्रचंड गदारोळ

दिल्ली सरकारच्या अख्यत्यारीतील बदल्या आणि प्रशासकीय निर्णयाचे सर्वाधिकार केंद्र सरकारला बहाल करणारे वादग्रस्त दिल्ली सेवा विधेयक आज लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडले त्याला विरोधी पक्षांनी जोरदार विरोध दर्शविला त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. या विधेयकाला पाठिंबा दाखवत बिजू जनता दलाने सरकारचीच री ओढली.

गोंधळातच राज्यसभेने आज बहुराज्यीय सहकारी संस्था समिती संशोधन विधेयकाला मंजुरी दिली.

विरोधी पक्षाचे नेते आज राष्ट्रपतीना भेटणार

मणिपूरच्या परिस्थितीची पाहणी करून आलेल्या विरोधी पक्षाच्या एकवीस खासदारांच्या शिष्टमंडळासह विरोधी पक्षाचे प्रमुख नेते उद्या (दि. 2) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांची सकाळी साडेअकरा वाजता भेट घेणार आहेत. मणिपूरच्या गंभीर परिस्थितीत राष्ट्रपतीनी हस्तक्षेप करून सरकारला योग्य ते निर्देश द्यावेत, अशी विनंती उद्या विरोधी नेत्यांकडून राष्ट्रपतीना केली जाणार आहे.

संसद ठप्पच

मणिपूर च्या मुद्दय़ाला आज दिल्ली सेवा विधेयकाच्या मुद्दय़ाची जोड मिळाल्याने संसदेत आज जोरदार हंगामा झाला. परिणामी दोन तहकुबीनंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.