‘जीएसटी’बाबत नरेंद्र मोदींची भूमिका बदलली, शरद पवार यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जीएसटी लागू करण्याबाबत मनमोहनसिंग सरकारच्या काळात राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जीएसटीवर सर्वाधिक हल्ला गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी केला होता. मात्र आज जीएसटीबाबत त्यांची भूमिका बदलली आहे. जीएसटीतून अधिक उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र त्याचा थेट परिणाम सर्वच व्यवसायांवर झालेला दिसत आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. कराचा किती बोजा टाकायचा याचा विचार करा, असेही पवार म्हणाले.

बारामती मर्चंटस असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी व्यापाऱयांनी जीएसटीबाबत नाराजी व्यक्त केली. हाच धागा पकडत पवार यांनी कर रचनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. शरद पवार म्हणाले, सध्या सोन्याच्या खरेदीवर 38 टक्क्यांपर्यंत, वाहन खरेदीवर 40 टक्क्यांपर्यंत कर लावला जातो. महाराष्ट्र ऑटोमोबॉईल हब आहे, या माध्यमातून रोजगार निर्मिती तर होतेच पण त्या बरोबर अनेक लघुद्योगही चालतात, यामुळे हा कर या सर्वांवर परिणाम करणारा ठरत आहे, अशी चिंता पवार यांनी व्यक्त केली. तसेच व्यापार वाढवायचा असेल तर राज्य व पेंद्राचे धोरण पूरक हवे, प्रोत्साहनात्मक हवे. चांगले वातावरण तयार करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.