26/11 : नरीमन हाऊसमधील स्मृतिदालनाचे आज उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईवर झालेल्या ‘26/11’ दहशतवादी हल्ल्यात कुलाब्यातील ज्यूधर्मीयांच्या नरीमन हाऊसलाही लक्ष्य करण्यात आले. ज्यू धर्मकेंद्र असलेल्या नरीमन हाऊसमधील चार ज्यूंची दहशतवाद्यांनी हत्या केली. यात एक ज्यू धर्मगुरू आणि त्याच्या गरोदर पत्नीचाही समावेश होता. वेदनेचा, दुःखाचा हा हुंकार ज्यूधर्मीय जपणार आहेत. नरीमन हाऊसमध्ये स्मृतिदालन उभारले जाणार आहे. सोमवार, 26 नोव्हेंबरला या स्मृतिदालनाचे उद्घाटन होणार आहे.

‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्यात लष्कर, पोलीस आणि दहशतवाद्यांत उडालेल्या चकमकीत या इमारतीचे मोठे नुकसान झाले. पोलीस आणि लष्कराच्या एनएसजी कमांडोंनी केलेल्या कारवाईत बाबर इम्रान आणि नाझीर हे दोघे पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले. एनएसजी कमांडो गजाननसिंह बिश्त हे शहीद झाले.

नरीमन हाऊस झाले ‘नरीमन लाइट हाऊस’
नरीमन हाऊस हे ज्यू धर्मकेंद्र आहे. याचे नामकरण करण्यात आले असून नरीमन हाऊस आता ‘नरीमन लाइट हाऊस’ म्हणून ओळखले जाणार आहे. तिथे पेटती मशाल ठेवण्यात येणार आहे. कितीही अंधकार असो, काळोख असो तिथे प्रकाश हा असतोच. पेटती मशाल हे त्याचे प्रतीक असणार आहे. मानवतेच्या कल्याणासाठी शांततेचा संदेश देण्याचे काम हे नरीमन लाइट हाऊस करणार आहे.

‘या इमारतीत ज्यांचे प्राण गेले त्या सर्वांची नावे इमारतीच्या छतावर कोरली जाणार आहेत. मुंबईत सहा ठिकाणी हल्ले झाले, मात्र हे सहा हल्ले नसून एक हल्ला होता, ठिकाणे मात्र वेगवेगळी होती. ही वास्तू हल्ल्यात जीव गमावल्यांना अर्पण करण्यात येणार आहे.’
– इस्रायल कोझ्लोवस्की, ज्यू धर्मगुरू