रजपुतों की शान

494

अनंत सोनवणे,[email protected]

नरनाळा अभयारण्य राजपूत राजा नरनाळा सिंग यांचे नाव या अरण्यास दिले आहे….

मूर्ती लहान, पण कीर्ती महान असलेल्या वनांमध्ये अकोला जिह्यातल्या नरनाळा वन्य जीव अभयारण्याचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. या अभयारण्याचे क्षेत्रफळ १३ चौरस किलोमीटरपेक्षाही कमी आहे. आकाराने इतके लहान असले तरी या अभयारण्यातली जैवविविधता अचंबित करणारी आहे. इथे वन्य जीवांची घनता अतिशय उत्तम आहेच. शिवाय या जंगलातले निसर्गसौंदर्य आपल्या डोळय़ांचे पारणे फेडल्याशिवाय राहत नाही. इथल्या समृद्ध जैवविविधतेमुळे २ मे १९९७ रोजी हे घनदाट जंगल नरनाळा वन्य जीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.

अकोल्यापासून ६० कि.मी. अंतरावर सातपुडय़ाच्या डोंगररांगांमध्ये हे अभयारण्य वसले आहे. अकोट-हरिसाल महामार्गावर पोपटखेडा या गावापासून पश्चिमेला हे जंगल सुरू होते. हे जंगल सुप्रसिद्ध मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे. हे शुष्क पानगळी प्रकारचे जंगल असून इथले तापमान साधारणतः ३५ ते ४३ अंश सेल्सियस असते. वर्षभरात इथे ५०० ते ९०० मि.मी. पाऊस पडतो. या अभयारण्यात काही नैसर्गिक तलाव आहेत. त्यामुळे वन्य जीवांसाठी पाण्याची सोय होते.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला संलग्न असल्याने नरनाळा वन्य जीव अभयारण्यात वाघांचा वावर आहे. मात्र त्याचे दर्शन क्वचितच होते. इथली भौगोलिक रचना आणि वाघांची मर्यादित संख्या यामुळे इथे वाघ दिसणे दुर्मिळ घटना आहे. या जंगलात बिबटय़ाचाही वावर आहे. त्याशिवाय झिपरे अस्वल, रानडुक्कर, चांदी अस्वल, रानगवा, काळिंदर, ताडमांजर, उदमांजर, रानमांजर, मुंगूस, ससा, चितळ, नीलगाय, काकर, चौशिंगा, वानर इत्यादी प्राणीही इथे पाहायला मिळतात. उडणारी खार हा वैशिष्टय़पूर्ण वन्य जीवसुद्धा इथले एक महत्त्वाचे आकर्षण आहे.

पक्ष्यांच्या बाबतीतही हे जंगल अतिशय समृद्ध आहे. इथे स्वर्गीय नाचण, रातवा, विविध प्रकारची घुबडे, पिंगळा, महाभृंगराज, चातक, पावशा, टकाचोर, कुहुवा, विविध प्रकारचे पोपट, नीलमणी, वटवटे, शिंपी, विविध प्रकारच्या मुनिया, पिपिट, सुगरण, तांबट, सोनपाठी सुतार, मराल बदक, टिबुकली, पाणकावळा, ढोकरी, लाल बगळा, लालसरी, चक्रवाक, रंगीत करकोचा, काळा करकोचा, काळा आपबीस, पांढरपोट खंडय़ा, शबल खंडय़ा इ. प्रकारचे पक्षी आढळतात. नरनाळा वन्य जीव अभयारण्य संपूर्ण वर्षभर पर्यटकांसाठी खुले असते. ऑक्टोबर ते फेब्रुवारी आणि एप्रिल ते मे हा कालावधी इथे वन्य जीवांच्या निरीक्षणासाठी योग्य मानला जातो. विशेषतः उन्हाळय़ात पाण्याच्या कमतरतेमुळे मर्यादित पाणवठय़ांवर वन्य जीवांचे निरीक्षण करणे अधिक सुलभ होतं.

इथे असलेल्या नरनाळा किल्ल्यामुळे या अभयारण्याला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. गोंड राजांच्या काळात बांधल्या गेलेल्या या डोंगरी किल्ल्याला शाहनूर किल्ला असेही म्हणतात. राजपूत राजे नरनाळा सिंग यांच्या नावावरून त्याला नरनाळा हे नाव मिळाले. मुस्लिम संत हजरत बुऱहानुद्दीन यांच्या आसपास अनेक पांढरे वाघ त्या काळी या किल्ल्यात वावरत असत अशी कथा सांगितली जाते. आजही हा किल्ला आपले भग्नावशेष सांभाळत इतिहासाची साक्ष देत उभा आहे. तिथून अभयारण्याचे विहंगम दृश्य दिसते ते केवळ नजरबंदी करणारे असते.

नरनाळा वन्य जीव अभयारण्य

प्रमुख आकर्षण…अप्रतिम निसर्गसौंदर्य

जिल्हा…अकोला

क्षेत्रफळ…१२.३४ चौ. कि.मी.

निर्मिती…२ मे १९९७

जवळचे रेल्वे स्थानक…अकोला (६०कि.मी.)

जवळचा विमानतळ…नागपूर (३०० कि.मी.)

निवास व्यवस्था…अकोला इथे खासगी हॉटेल्स

सर्वाधिक योग्य हंगाम…ऑक्टोबर ते फेब्रुवारी व एप्रिल-मे

सुट्टीचा काळ…नाही

साप्ताहिक सुट्टीचा दिवस …नाही

 

आपली प्रतिक्रिया द्या