नासाचं ‘ध्रुवीय मिशन’; पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करणार

 

 

हवामान बदलासंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नासाने ध्रुवीय प्रदेशातील उष्णतेच्या गतीवर संशोधन मोहीम करण्याचा ठरवले आहे. नासा यासाठी ध्रुवीय मिशन राबविणार आहे, असे नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) ने म्हटले आहे. पोलर रेडियंट एनर्जी इन द फार – इन्फ्रा रेड एक्सपरिमेंट असे या मोहिमेचे नाव असून पृथ्वीवरील सर्वात दुर्गम प्रदेशापैकी एक आर्क्टिक आणि अंटार्क्टिकाचा अभ्यास करण्यात येणार आहे.

उष्णता किती प्रमाणात अंतराळात जाते, याचे मोजमाप घेण्यासाठी शूबॉक्सच्या आकाराचे दोन हवामान उपग्रह अंतराळात सोडले जाणार आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून आणि वातावरणातून बाहेर अंतराळात जाणाऱया उष्णतेचे मोजमाप घेण्यासाठी थर्मल इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटरचा वापर केला जाणार आहे. या मोहिमेच्या आधारे ध्रुवीय ग्रीनहाऊस परिणामाबद्दल अधिक माहिती मिळू शकेल. वातावरणातील बाष्प, ढग आणि अन्य घटकामुळे उष्णता कशाप्रकारे रोखली जाते, याचा अभ्यास केला जाणार आहे. समुद्रीसपाटी – हवामान,बर्फाच्या आवरणातील बदल समजून घेण्यात मदत होईल.

मिशनकडून अपेक्षा

-पृथ्वीच्या वातावरणाचा आणि बर्फाचा ध्रुवीय प्रदेशामधून बाहेर जाणाऱया उष्णतेवर कसा परिणाम होतो.

– 1970 पासून आर्क्टिक प्रदेश पृथ्वीपेक्षा दीडपट वेगाने कसा गरम होत आहे.

– पर्वतावरील बर्फ आणि समुद्री बर्फाच्या माध्यमातून किरणोत्सर्ग कसा तयार होतो.

– पृथ्वी आणि आकाश यांच्यातील उष्णतेची देवाणघेवाणसंबंधी माहिती.

–  बर्फाच्या थरावर वातावरणाच्या तापमानावर आणि जागतिक हवामानावर कसा परिणाम होतो.

 

.