नासाने विक्रमला केले ‘हॅलो’

1371
vikram-lander

चंद्राच्या पृष्ठभागावर कलंडलेल्या अवस्थेत पडलेल्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याचा इस्रो अथक प्रयत्न करत आहे. पण अजूनही त्यास हवे तसे यश मिळत नसल्याने नासा विक्रमशी संपर्क करण्यासाठी पुढे सरसावली आहे. नासाने नुकताच विक्रम लँडरला ‘हॅलो’ असा मेसेज पाठवला आहे.

सात सप्टेंबरला विक्रम लँडर नियोजनाप्रमाणे चंद्रावर उतरला नाही. त्यानंतर इस्रोशी त्याचा संपर्कही तुटला. यामुळे विक्रमचे नेमके काय झाले याकडे देशाबरोबरच जगभराचे लक्ष लागून होते. याचदरम्यान चंद्राभोवती भ्रमण करणाऱ्या ऑर्बिटरने विक्रमच्या काही थर्मल इमेज इस्रोला पाठवल्या. त्यावरून विक्रम सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या आशा पल्लवित झाल्या व त्यांनी विक्रमशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. याचदरम्यान अमेरिकेच्या नासानेही विक्रमबरोबर संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नासा विक्रमच्या डीप स्पेस नेटवर्क -डीएसएनच्या द्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. यास इस्रोने सहमती दिली असून विक्रमशी लवकरात लवकर संपर्क करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 20-21 सप्टेंबरला जेव्हा चंद्रावर रात्र असणार आहे. त्याआधी विक्रमशी संपर्क झाला नाही तर चांद्रयान-2 मिशन पूर्णत यश मिळाले नाही हे स्पष्ट होणार आहे.

तसेच अमेरिकन अंतराळवीर स्कॉट टिल्ले यांनी देखील नासा विक्रमबरोबर संपर्क करत असून कॅलिफोर्नियातील डीएसएन स्टेशनने विक्रम लँडरला रेडीओ फ्रीक्वेन्सीमधून हॅलो असा मेसेज पाठवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विक्रमला संदेश पाठवताना चंद्र रेडीओ रिफ्लेक्टरचे काम करतो. त्यातून मिळालेल्या ध्वनी लहरींचे 8,00,000 किलोमीटर प्रवास केल्यानंतर संदेशात रुपांतर होते. यामुळे नासाच्या हॅलोला विक्रम लँडर काय उत्तर देतो याकडे जगभराचे लक्ष आहे.

आपली प्रतिक्रिया द्या