
सामना प्रतिनिधी । न्यूयॉर्क
वैज्ञानिक चंद्रावर उतरण्याच्या घटनेला 50 वर्षांहून अधिक काळ लोटला असून या पहिल्या चंद्रमोहिमेत वैज्ञानिकांनी चंद्रावर केलेला कचरा पृथ्वीवर आणण्यासाठी ‘नासा’ने खास मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेसाठी 2024 पर्यंत नासाचे शास्त्रज्ञ चंद्राच्या दिशेने कूच करण्याची शक्यता आहे.
चंद्रावर गेलेल्या शास्त्रज्ञांनी तेथील वैज्ञानिक माहितीसह दगडधोंडे, मातीचे नमुने पृथ्वीवर आणले होते, मात्र या शास्त्रज्ञांनी बर्याच वस्तू चंद्रावरच सोडल्या होत्या. त्यात नील आर्मस्ट्राँग यांच्या पायांचे निशाण, अमेरिकेचा झेंडा आणि मानवी मलमूत्राच्या सुमारे 96 बॅगा होत्या. आता ‘नासा’चे शास्त्रज्ञ हा कचरा पुन्हा पृथ्वीवर आणून चंद्रावरील जीवनमानाचा शोध लावणार आहे. चंद्रावर एकूण 12 अंतराळवीर पोहोचले होते. ‘नासा’ने या अंतराळवीरांसाठी खास पद्धतीचे कपडे बनविले होते. त्यात डायपर्सचाही समावेश होता. या अंतराळवीरांनी नाइलाजास्तव हा कचरा चंद्रावर टाकला.
म्हणून कचरा चंद्रावरच ठेवावा लागला
चंद्रावर गेलेल्या स्पेसक्राफ्टमधून ठरावीक वजन वाहून नेण्याची क्षमता होती. त्यापेक्षा जास्त वजन झाले असते तर कदाचित अंतराळवीरांच्या जिवावर बेतले असते. त्यामुळे चंद्रावरून पृथ्वीवर परतताना अंतराळवीरांना कचरा इतर बिनकामाच्या वस्तू चंद्रावरच सोडाव्या लागल्या. ट्रम्प सरकार ‘नासा’ची चांद्र मोहीम लवकरात लवकर सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी 2024 पर्यंतची डेडलाइन ठरविण्यात आली आहे.
असे असेल संशोधन
मानवी मलमूत्रात आजही बॅक्टेरिया जिवंत आहेत का हे जाणून घेण्याची उत्सुकता शास्त्रज्ञांना आहे. कचर्याच्या पिशव्या कडक झाल्या तर त्यात बॅक्टेरिया आहेत यावर शिक्कामोर्तब होईल. तसेच जर बॅक्टेरिया मृत असतील तर त्यांच्या अभ्यास करणे महत्त्वपूर्ण ठरेल. कारण हे बॅक्टेरिया किती काळ जिवंत होते याचा शास्त्रज्ञ शोध लावू शकतील.
- चंद्राचे तापमान 170 डिग्री सेल्सिअस ते 156 डिग्री सेल्सिअस आहे.
- मानवाचे 50 टक्के मलमूत्र हे बॅक्टेरियापासून तयार झालेले असते.
- वैज्ञानिक या मलमूत्रातील बॅक्टेरियावर संशोधन करणार आहेत.
- या संशोधनावरून अंतराळात जीवन आहे का हे तपासले जाणार आहे.

























































