
नाशिकसाठी दहा हजार रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध झाला आहे. यामुळे या इंजेक्शनचा तात्पुरता तुटवडा कमी झाला असून, कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे. शिवसेना खासदार हेमंत गोडसे आणि महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
नाशिक आणि जिल्ह्यात रेमडेसिवीरचा मोठा तुटवडा आहे. या इंजेक्शनसाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनीही आंदोलन केले. हे इंजेक्शन उपलब्ध व्हावे यासाठी शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी हालचाली सुरू केल्या. नाशिक जिल्ह्यासाठी मायलॉन कंपनीने दहा हजार रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध करून द्यावा, यासाठी गोडसे यांनी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी नरेश हसीजा यांच्याशी संपर्क साधला. बुधवारी सहा हजार इंजेक्शनचा साठा बेंगलोरहून विमानाने मुंबईत आला व त्यानंतर हा साठा बाय रोड नाशिककडे निघाला. संध्याकाळपर्यंत तो पोहचेल, असे गोडसे यांनी सांगितले.
महापालिकेला अडीच हजार इंजेक्शन
नाशिक शहरातील महापालिका रुग्णालयासाठी वीस हजार इंजेक्शनची मागणी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केली. काही इंजेक्शनची रक्कम मायलॉन कंपनीला ऑनलाईन भरली. लवकरात लवकर पुरवठा व्हावा यासाठी आयुक्त जाधव यांनी कंपनीचे दक्षिण आफ्रिकेचे हेड पी. के. सिंग यांच्याशी संपर्क साधला. टप्प्याटप्प्याने पुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानुसार मंगळवारी रात्री अडीच हजार इंजेक्शन हे महापालिकेला प्राप्त झाले. त्याचा वापर महापालिकेच्या बिटको आणि झाकीर हुसेन रुग्णालयात सुरू झाला आहे. दोनशे इंजेक्शन हे जिल्हा रुग्णालयाला देण्यात आले. आयुक्तांच्या प्रयत्नांना यश आल्याने सामान्य रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
रुग्णालये, एजन्सींना 1594 चा पुरवठा
नाशिक शहरातील काही खासगी रुग्णालये, औषध विक्रेते आणि वितरक यांनी कंपनीकडे मागणी केल्याने त्यांनाही 1594 इंजेक्शनचा पुरवठा कंपनीकडून थेट करण्यात आला आहे.
आवश्यकतेनुसार वाटप होणार
महापालिकेव्यतिरिक्त जो साठा आला आहे, त्याचे वाटप हे खासगी रुग्णालयांना प्राधान्यक्रमाने होणार आहे. कोणत्या रुग्णालयात कोणत्या रुग्णाला या इंजेक्शनची खरोखर आवश्यकता आहे, हे तपासून त्या रुग्णालयाला पुरवठा करण्यात येणार आहे.



































































