नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण: रब्बी हंगाम संकटात, किमान तापमान 17 अंशांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक

नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे थंडी नाहिशी होऊन किमान तापमान दोन दिवसात 11वरून 17 अंशांवर पोहचले आहे. वातावरणातील या बदलांमुळे गहू व कांद्यावर किडीच्या प्रादुर्भावाची भीती असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

गुरुवारी, 31 जानेवारी रोजी नाशिक शहरात किमान तापमान 8.6 अंश सेल्सिअस होते. एक फेब्रुवारीनंतर तापमानात वाढ होत गेली. शनिवारी 2 फेब्रुवारीला 11, रविवारी 3 फेब्रुवारीला 13.2 इतके तापमान नोंदविले गेले. आज एकाच दिवसात तापमानात चार अंशांनी वाढ होवून पारा 17.4 अंशांवर पोहचला. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने थंडीही गायब झाली आहे. केवळ बोचऱ्या वाऱ्यामुळे काहीवेळा गारवा जाणवत आहे. जिल्ह्यातील कमाल तापमानही आता 30 ते 31 अंशांदरम्यान आहे. या वातावरणीय बदलाचा द्राक्षावर कोणताच परिणाम होणार नाही. मात्र, रब्बी हंगाम संकटात येवू शकतो. गहू व कांदा या पिकावर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव होवू शकतो, तर हरबऱ्यावर घाटी अळींचा दुष्परिणाम होण्याची भीती आहे.