
राज्यातील दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफ करावी ही मागणी ऑल इंडिया स्टुंडेंट फेडरेशन (एआयएसएफ) या संघटनेकडून करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवदेन देण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र भुसे यांनी या कार्यकर्त्यांना टाळत त्यांना उडवा उडवाउडवीची उत्तर दिली. त्यामुळे कार्यकर्ते संतापले असून त्यांनी या घटनेचा निषेध करत फी माफीसाठी अधिक कठोर पाऊले उचलणार असल्याचा इशारा दिला.
यंदा कमी पाऊस झाल्याने सरकारने राज्यातील काही भाग हा दुष्काळी भाग जाहीर केला आहे. यात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सिन्नर, येवला या तालुक्यांचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यातील इतरही काही तालुक्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती आहे. त्यामुळे सध्या शेतकरी वर्ग प्रचंड आर्थिक त्रासातून जात आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क पूर्ण माफ करावे अशी मागणी एआयएसएफने केली आहे.
राज्याचे मंत्री व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी या एआयएसएफच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र भुसे हे या कार्यकर्त्यांना टाळताना दिसले. ते भुसेंशी बोलण्याचा प्रयत्न करत असताना भुसे तेथून निघून गेल्याने कार्यकर्ते संतापले. मात्र जाताना भुसे यांनी ‘ही काय सांगायची गोष्ट आहे का? असे म्हटल्याचे समजते.


























































