
सामना प्रतिनिधी। नाशिक
उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाडीचे चाक तुटल्याचे वेळीच लक्षात आल्याने रविवारी मोठा अपघात टळला. नाशिक जिह्यातील नांदगाव ते पिंपरखेडदरम्यान गँगमनच्या सतर्कतेमुळे ही घटना लक्षात आली. दोन तासांनंतर ही रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्लाकडे रवाना करण्यात आली. यामुळे प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.
उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे बरौनी ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही सुपरफास्ट विशेष रेल्वे सोडण्यात आली आहे, ती रविवारी कुर्ल्याकडे जात होती. शेवटून दुसऱया बोगीचे एक चाक तुटल्याचे सकाळी आठ वाजता नांदगाव-पिंपरखेडदरम्यान गँगमनच्या निदर्शनास आले आणि तेथेच ही एक्प्रेस थांबविण्यात आली. नंतर दोन डबे वेगळे करून ते मनमाड यार्डात पाठविण्यात आले.


























































