
नाशिकमधील आयटी कंपनीतील महिलांच्या लैंगिक छळप्रकरणी कंपनीच्या अधिकारी महिलेला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
नाशिकमधील आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या महिलांवर लैंगिक अत्याचार व विनयभंग केल्याप्रकरणी या कंपनीतील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कृत्यातील संबंधितांना पाठीशी घालण्याचे काम कंपनीच्या एचआर अश्विनी अशोक चैनानी यांनी केले. तरुणींना धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्यातही तिचा सहभाग होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ती पसार झाली होती. पोलिसांनी तिला पुण्यातून अटक केली, शुक्रवारी न्यायालयाने 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिच्या अटकेमुळे लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
वेशांतर करून भंडाफोड
नाशिक पोलिसांकडे ही तक्रार गेल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हा तपास गुन्हे शाखेकडे दिला. महिला पोलीस अधिकाऱयांनी वेशांतर करून कंपनीत प्रवेश केला आणि पुरावे जमा केले, संबंधित सहा जणांना अटक केली.
गोमांस खायला दिले – गिरीश महाजन
या कंपनीत एका तरुणाचे धर्मांतर करण्यात आले, त्याच्यासह एका तरुणीला गोमांस खाण्यासाठी दिले, असा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला. यामागे लैंगिक अत्याचाराचे व धर्मांतराचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.
भाजपा युवा मोर्चाचे आंदोलन
नाशिकमधील भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व काही नगरसेवकांनी या आयटी कंपनीसमोर निदर्शने केली. घोषणाबाजी करीत कंपनीत घुसण्याचा प्रयत्न केला. कंपनी प्रशासनावर कारवाईची मागणी केली. पोलीस अधिकाऱयांनी कठोर कारवाईचे आणि सखोल चौकशीचे आश्वासन आंदोलकांना दिले.


























































