
नाशिकमधील आणखी एक धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे. नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱया महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच कंपनीतील आठ महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून एकूण सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे, यामुळे खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या मुंबई नाका भागात असलेल्या आयटी कंपनीच्या मॅनेजरने एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला, याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. याच कंपनीतील पाच जणांनी आठ महिलांचा विनयभंग केल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. एकूण सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांना गुह्यात सहाय्य करणाऱया दोन महिला फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या सर्व संशयितांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
धर्म परिवर्तनाचा प्रयत्न
तिघा संशयितांनी एका महिलेशी अश्लील वर्तन केले, तिला बळजबरीने मांसाहार खाण्यास दिले, धर्म परिवर्तनाचाही प्रयत्न केला, अशी तक्रार या महिलेने दिली आहे.
एसआयटी गठीत
गुह्याची व्याप्ती, गांभीर्य व संवेदनशीलता लक्षात घेऊन सखोल तपासासाठी विशेष तपास पथक गठीत करण्यात आले आहे. आणखी तक्रारी वाढण्याची शक्यता आहे.





























































