नाशिक : मोबाईल क्रमांक हॅक करून पाच लाखांची फसवणूक

1581

तुमच्या कंपनीचे नेटवर्क बंद होत असल्याचे सांगून मोबाईल क्रमांक हॅक करीत भामट्याने मालेगाव येथील एका व्यक्तीच्या खात्यातून अवघ्या चाळीस मिनिटात पाच लाख रुपये हडप केले. या ऑनलाईन फसवणूकप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मालेगावातील एका खाजगी कंपनीमध्ये निरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या सुधीरचंद्र घोष यांनी रविवारी दुपारी त्यांच्या फोनवरील जिओ अॅपमध्ये आलेले दोन संदेश पाहिले. त्यात दिलेल्या क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने तुमचा क्रमांक बंद होत असल्याने केवायसी करण्यास सांगितले. त्यासाठी किमान दहा रुपयाचा रिचार्ज करा असे सांगून घोष यांना बोलण्यात गुंतविले. दरम्यान, घोष यांच्या मोबाईलवर एक ओटीपी आला, आपण जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला ओटीपी सांगत नाही तोपर्यंत धोका नाही, असे वाटल्याने त्यांनी संभाषण सुरू ठेवले. दरम्यान, समोरच्या भामट्याने त्यांचा मोबाईल क्रमांक हॅक करून एचडीएफसी बँक खात्यातून अवघ्या चाळीस मिनिटात प्रत्येकी अडीच लाखांची रक्कम दोन वेळा काढून घेतली.

याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या