
नाशिक-मुंबई महामार्गावरील गोंदेफाटा परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एक थरारक घटना घडली. राजस्थानमधील जालोर-सिरोही मतदारसंघाचे भाजप खासदार लुम्बा राम चौधरी यांच्या 4 कोटीच्या आलिशान रेंज रोव्हर कारने अचानक पेट घेतला. या भीषण आगीत कार जळून खाक झाली. चालकाच्या प्रसंगावधानाने सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडल्याने अनर्थ टळला.
लुंबाराम चौधरी हे शुक्रवारी रात्री काही जणांसोबत त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी रेंजरोव्हर कारने निघाले. गोंदेफाटा परिसरात कारचालक अनिल जाधव यांना गाडीत काहीतरी जळाल्याचा वास येऊ लागला, त्यांनी प्रसंगावधान राखत गाडी रस्त्यालगत उभी केली. खासदार चौधरींसह अन्य प्रवासी खाली उतरताच कारने पेट घेतला. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

























































