
लष्कराच्या भूदल तुकडीतील विविध पदांची भरती प्रक्रिया शनिवारपासून देवळाली कॅम्प येथे सुरू आहे. आज बुधवारी नाशिकसह नऊ जिह्यांतील हजारो युवक दाखल झाले होते. रात्रभर थंडीच्या कडाक्यामुळे त्यांचे हाल झाले. अनेकांनी पहाटेपर्यंत पोलीस स्थानक आवारासह मिळेल तेथे आसरा घेतला.
टीए बटालियनमधील 116, 118 आणि 123 इफ्रन्ट्रीच्या ग्रेनेडिअर्स युनिट, लिपिक यासह विविध पदे भरली जात आहेत. मागील वर्षीच्या 138च्या तुलनेत यंदा तिप्पट पदसंख्या असल्याने मोठय़ा संख्येने तरुण देवळाली कॅम्प येथे दाखल झाले आहेत. 28 नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया होवून पुढे 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय चाचणी आदी टप्पे होतील. दरम्यान, पाचव्या दिवशी बुधवारी नाशिक, चंद्रपूर, मुंबई, गोंदीया, यवतमाळ, पुणे, रायगड, परभणी जिह्यांसाठी भरती होती. पहाटेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मैदानावर प्रक्रिया सुरू होत असल्याने काल सायंकाळपासून पहाटेपर्यंत हजारोंच्या संख्येने तरुण पोहोचले. निवाऱयाची सोय नसल्याने मिळेल त्या जागी, नाही तर रस्त्याजवळच जेवण करून त्यांनी विश्रांती घेतली. काही संस्था, दानशूर नागरिकांनी पिण्याचे पाणी व जेवणाची व्यवस्था करत त्यांना दिलासा दिला.
सध्या नाशिक परिसराचे किमान तापमान 9 अंश सेल्सिअसच्या घरात आहे. थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे पुरेसे नसल्याने शेकोटय़ा पेटवल्या जात आहेत. त्यानंतर ते देशसेवेचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने मोठय़ा उत्साहात पहाटेच भरती प्रक्रियेत सहभाग घेत असल्याचे चित्र आहे.




























































