
कुंभमेळ्यानिमित्त साधुग्राम उभारताना महापालिकेने वृक्षतोड करू नये यासाठी पर्यावरणप्रेमींनी बुधवारी तपोवनात चिपको आंदोलन केले. त्यात मोठय़ा संख्येने नाशिककर सहभागी होते.
साधुग्राम उभारण्यासाठी सुमारे 1200 एकर जागा ताब्यात घेण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. तेथील सुमारे 1700 झाडांची तोडणी, छाटणी आणि पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने मांडला आहे. त्यासंदर्भातील नोटीस 11 नोव्हेंबरला प्रसिद्ध करून हरकती मागवल्या होत्या. सात दिवसांत तब्बल 450 हरकती दाखल झाल्या आहेत.
तपोवन देशी प्रजातीच्या वृक्षराजीने समृद्ध आहे. हा सगळा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा प्रदेश आहे, त्यामुळे येथील वृक्षवैभव जपले पाहिजे. या भागात मोठमोठे चिंच, जांभूळ, कडुनिंबाचे हेरिटेज वृक्ष आहेत, ते तोडल्यास शहरातील तापमानात वाढ होईल, हवेची गुणवत्ता ढासळेल, पाणीसाठय़ावर परिणाम होईल याकडे लक्ष वेधून हरकती नोंदवण्यात आल्या. त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
या पार्श्वभूमीवर आज बुधवारी पर्यावरणप्रेमी तपोवनात एकत्र आले. येथील सर्वच झाडे जपा, तोडू नका, ऑनलाइन हरकती नोंदवणाऱयांनादेखील सुनावणीसाठी बोलवा, हरितकुंभ साजरा करा या मागण्यांसाठी त्यांनी चिपको आंदोलन केले. यात भाकपचे राज्य सहसचिव राजू देसले, तल्हा शेख, रोहन देशपांडे, काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र बागुल, भारती जाधव, पद्माकर इंगळे, मनोहर पगारे, ऋषीकेश नाजरे, योगेश बर्वे, आनंद रॉय, संदीप भानोसे, विश्वजीत कार, ऍड. प्रभाकर वायचळे, कैवल्य चंद्रात्रे, तुषार पिंगळे आदी सहभागी झाले होते.




























































