
तालुक्यातील महालपाटणे पाठोपाठ वाखारी येथे बिबटय़ाने धुमाकूळ घालून दोन बैलांना फस्त केले, यामुळे पशुपालक, शेतकरी धास्तावले आहेत.
महालपाटणे येथे रविवारी बिबटय़ाने बैलाला हल्ला चढवून फस्त केले. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच वाखारीत त्याने धुमाकूळ घातला. येथील रवींद्र भदाणे यांच्या गोठय़ातील बैलावर हल्ला चढवून ठार केले. ही माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या भागात बिबटय़ाचा संचार वाढला आहे. त्याने अनेक पाळीव जनावरांचा फडशा पाडल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रामस्थांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. तातडीने पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वनपाल विजय पगार, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र पवार यांच्याकडे केली आहे.




























































