
सिन्नर बसस्थानकात बुधवारी सकाळी ब्रेक नादुरुस्त झाल्याने एसटी फलाटावर चढली. तिच्याखाली चिरडून नऊवर्षीय मुलाचा मृत्यू झाला. त्याच्या आजोबांसह दोन महिला असे तिघे गंभीर जखमी आहेत. नादुरुस्त बसमुळे मुलाचा बळी गेल्याने संतप्त नागरिकांनी दुपारी रास्ता रोको केला.
या बसस्थानकात सकाळी अकरा वाजता हा भीषण अपघात घडला. सिन्नर आगारातून देवपूरला जाण्यासाठी ही बस फलाटावर लागणार असल्याने मोठय़ा संख्येने प्रवाशी प्रतिक्षेत होते. दरम्यान, ब्रेक नादुरुस्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ही बस थेट फलाटावर चढली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांची पळापळ झाली. मात्र, लांब जाण्याची संधीच न मिळाल्याने देवपूरचा आदर्श योगेश बोराडे (9) याचा जागीच मृत्यू झाला, त्याचे आजोबा व अन्य दोन महिला गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. चालकाला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या अपघाताने सर्वजण हादरले. नादुरुस्त बसमुळे हा भीषण अपघात घडल्याने नागरिक संतप्त झाले. बसस्थानकाबाहेरील रस्त्यावर दुपारी 3 वाजता रास्ता रोको करून त्यांनी या घटनेचा निषेध केला. पोलीस अधिकाऱयांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.




























































