उत्तर महाराष्ट्रात नंदुरबारमध्ये सर्वाधिक 69 टक्के मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी उत्तर महाराष्ट्रात अमाप उत्साहात मतदान पार पडले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत नाशिक मतदारसंघात अंदाजे 56, तर दिंडोरीत 61 टक्के मतदान झाले. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार मतदारसंघात सर्वाधिक 69 तर धुळ्यात 57 टक्के मतदान झाले. नाशिकमध्ये मतदानाची वेळ संपल्यानंतरही केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा होत्या.

नाशिक शहर व जिह्यात सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. मॉर्निंग वॉकसाठी आलेले नागरिक आपले ओळखपत्र घेऊनच घराबाहेर पडले होते. यामुळे त्यांनी सुरुवातीला मतदान करण्याचा हक्क बजावला. गेल्या तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा जास्त असल्याने सकाळी अकरा वाजेपर्यंत वृद्धांची मतदान केंद्रावर मोठी गर्दी होती. एक-दीड तास संथ गतीनंतर सर्वत्र पुन्हा मतदान केंद्रांवर रांगा होत्या. दुपारी चारपासून त्यात वाढ झाली आणि मतदानाची टक्केवारीही झपाटय़ाने वाढली. वाढत्या तापमानाचा मतदानावर परिणाम जाणवला नाही. उन्हाची पर्वा न करता मतदार घराबाहेर पडले होते. सहा वाजेला मतदानाची वेळ संपली

.नाशिक मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45, तर दिंडोरीत 48 टक्के मतदान झाले होते. महायुतीचे शिवसेना उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी सकाळीच मतदान केले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनीही सकाळी सिडकोतील मतदान केंद्रावर मतदान केले.

मतदार यादीत घोळ
नाशिकमध्ये मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या मातोश्रींचे नावच मतदार यादीतून गायब असल्याचे निदर्शनास आले. अनेक मतदारांची नावे गायब होती, काहींची नावे तर नाशिकऐवजी दिंडोरी मतदारसंघात आढळली. यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले, त्रास सहन करावा लागला.

मतदान यंत्रात बिघाड

सामना प्रतिनिधी। कळवण

जिह्यात 21 मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या घटना घडल्या. इगतपुरीत चार मतदान यंत्रात बिघाड झाला होता. मालेगाव येथेही एक यंत्र बंद पडले होते. ही यंत्रे बदलून देण्यात आली. सुरगाणा मतदार संघात 67 टक्के मतदान

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवणुकीत सोमवार (29) रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत मतदार यादीतील घोळ वगळता कळवण शहर व तालुक्यात मतदान शांततेत पार पडले. रणरणत्या उन्हातही ,मतदारांचा मतदान करण्याचा उत्साह दिवसभर कायम होता. कळवण सुरगाणा विधानसभा मतदार संघात 67 टक्के मतदान झाले. कळवण विधानसभा मतदार संघात 388 मतदान केंद्र असून कळवण तालुक्यात 170 मतदान केंद्रावर सात वाजता मतदान प्रक्रियेस सुरवात होताच पहिल्याच तासात 8 टक्के मतदान झाले होते. मात्र त्यानंतर मतदारांचा ओघ वाढल्याने मतदानाची टक्केवारीची वाढली. कष्टकरी व शेतकरी वर्गाला कमला जाण्याची ओढ असल्याने बहुतांशी ठिकाणी त्यांनी मतदानासाठी गर्दी केली होती.

येवला विधानसभा मतदारसंघात 60 टक्के मतदान

येवला प्रतिनिधी येवला विधानसभा मतदारसंघातील एकूण 316 मतदान केंद्रांवर सोमवारी शांततेत व सुरळीत मतदान पार पडले.मतदार संघात एकूण 60 टक्के मतदान झाले.

सोमवारी लोकसभा निवडणुकीसाठी या येवला मतदारसंघात मोठया चुरशीने व शांततेत मतदान पार पडले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रासह मोठया गावातील मतदान केंद्र परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

वडिलांचा अंत्यविधी उरकून पोलिसाने बजावले मतदान

येवला- नाशिक शहर पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस शिपाई छगन सोनवणे यांचे वडिल नामदेव रामा सोनवणे (80) यांचे सोमवारी मतदानाच्या दिवशीच सकाळी निधन झाले. दुपारी 2 वाजता नगरसुल येथील पिपंळाचा मळा येथे वडिलाचा अत्यविधी उरकून स्वतः पोलीस दलात कार्यरत असताना छगन सोनवणे यांनी पत्नी माजी पंचायत समितीच्या माजी सभापती भारती यांच्यासह नगरसुल येथील मतदान केंद्र 95 वर मतदान करीत राष्टीय कर्तव्य पार पाडले.

पैसे वाटताना तरुण ताब्यात

देवळाली कॅम्प येथील धोंडी रोड येथे पोलिसांच्या गस्त पथकाला भिमा पोपट आहेर मतदारांना पैसे वाटताना आढळला. पाच हजार नऊशे रुपयांसह ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या कारमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांची प्रचारपत्रके सापडली.

मालगव्हाणमध्ये बहिष्कार

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सुरगाणा तालुक्यात मालगव्हाण येथे मतदारांनी बहिष्कार टाकला. येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदार फिरकलेच नाहीत. येथे सुमारे साडेसातशे मतदार आहेत.

अनोखी 15 सखी मतदान केंद्रे

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महिला कर्मचारी, अधिकाऱयांच्या नेतृत्वाखाली जिह्यात 15 ठिकाणी सखी मतदान केंद्र कार्यरत करण्यात आली होती. केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष, सहाय्यक आदी कर्मचारी, अधिकारी येथे महिलाच होत्या. हे केंद्र फुगे लावून सजविण्यात आले होते. आकर्षक रांगोळी काढून मतदारांचे स्वागत करण्यात आले होते. या केंद्रावर मतदानाचा वेगळाच उत्साह होता.