खेड्यापाड्यांवरील मुलांसाठी स्थानिक शैक्षणिक चॅनेलद्वारे अभ्यासक्रमाचे प्रसारण, केबल नेटवर्कचा पुढाकार

726

>> राजेंद्र पवार, पिंपळगाव 

कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी शहरात ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य मिळाले. मात्र, खेड्यापाड्यांवरील गोरगरीब मुले वंचित राहिली. त्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करीत नाशिक जिल्हा परिषदेच्या कोकणगाव केंद्रातील शिक्षकांनी केबल नेटवर्कच्या माध्यमातून नवे स्थानिक ‘रेनबो बालभारती’ हे शैक्षणिक चॅनेल सुरू करीत ऐंशीहून अधिक गावातील मुलांना अभ्यासक्रमाचे धडे देण्यास सुरुवात केली. दोन महिन्यांपासून हे चॅनेल सुरू असून, अद्ययावत पद्धतीने तयार केलेल्या व्हिडीओंमुळे हसत-खेळत शिक्षणाचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

निफाड तालुक्यातील पिंपळगाव-बसवंतजवळील देवीचा माथा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र वाघ यांच्या संकल्पनेतून इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘रेनबो बालभारती’ चॅनेल प्रत्यक्षात उतरले. देवीचा माथा वस्तीवरील शाळेत 260 पैकी फक्त पाचच मुलांच्या पालकांकडे स्मार्टफोन असल्याने या भागात ऑनलाईन शिक्षण अशक्य असल्याचे लक्षात आले. मजूर कुटुंबातील मुलांचे शिक्षण सुरू राहावे, यासाठी स्थानिक शैक्षणिक चॅनेल हा पर्याय समोर ठेवून त्यांनी रेनबो नेटवर्कच्या संचालकांशी संपर्क साधला. त्यांनी तयारी दर्शविल्यानंतर छायाचित्रणासाठी ओझर येथील टिमची मदत घेतली. कोकणगाव केंद्राला स्टुडिओचे रूप आले. या केंद्राअंतर्गत असलेल्या शाळांमधील 20 शिक्षकांच्या माध्यमातून शैक्षणिक पाठाचे छायाचित्रण सुरू झाले. अगदी डबिंग, एडिटिंग करून या व्हिडीओचे चॅनेलवर प्रसारण केले जात आहे. त्यामुळे मुले घरबसल्या टिव्हीवरून धडे गिरवत आहेत. जिल्ह्यातील निफाड, नाशिक, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, येवला तालुक्यात हे प्रसारण सुरू आहे. या आदर्श उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हसत-खेळत शिक्षणासाठी पपेट, खेळांचा वापर

शैक्षणिक व्हिडीओ तयार करताना बोलक्या बाहुल्या, खेळ, गाणे, गोष्टी, योगा यांचा गरजेनुसार वापर केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढण्यास मदत होत आहे.

शिक्षण सुरू राहावे हाच ध्यास

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणत्याच कारणामुळे खंड पडू नये म्हणून हा प्रयोग केला. दोन महिन्यांमध्ये वीसहून अधिक व्हिडीओ प्रसारित झाले आहेत. प्रत्यक्षात शाळा सुरू होईपर्यंत या चॅनेलवरून शिक्षण देण्यात येईल. हे टिमवर्क आहे. यासाठी अनेकांचे सहकार्य मिळाले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना हा अभिनव प्रयोग आवडतोय याचा आनंद आहे, अशी प्रतीक्रिया देवेंद्र वाघ यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या