नाशिक – ‘मनोधार’चा तणावग्रस्तांना मदतीचा हात , हेल्पलाईनसाठी महापालिकेसह 3 संस्थांमध्ये करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तणावाखाली असलेल्या रूग्ण व इतर नागरिकांचे समुपदेशन करण्यासाठी नाशिक महापालिका, भोसला कँम्पस आणि नाशिक सायकॅट्रीक सोसायटीने पुढाकार घेतला आहे. ‘मनोधार’च्या माध्यमातून हेल्पलाईनद्वारे नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. या करारावर महापालिकेसह दोन्ही संस्थांनी स्वाक्षरी केली आहे.

एका बैठकीत नुकताच हा करार करण्यात आला. या करारावर महापालिकेकडून आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके, नाशिक सायकॅट्रीक सोसायटीचे डॉ. उमेश नागापूरकर आणि भोसला मिलीटरी कॉलेजचे प्राचार्य डॉ. यु. वाय. कुलकर्णी यांनी स्वाक्षरी केली. तीन महिन्यांसाठी हा करार आहे. यात तिन्ही संस्थांची जबाबदारी निश्चित करून कामाचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या लोकांना नाशिक सायकॅट्रिक सोसायटीकडून व्हिडीओ मिटींग अॅपद्वारे प्रशिक्षण देणे, सेलकडे थेट वैयक्तिक संपर्क साधणाऱ्या अथवा इतरांच्या माध्यमातून येणाऱ्या रूग्णांचे समुपदेशन करणे, या संसर्गाच्या काळात आत्महत्येसारख्या प्रकारांना प्रतिबंध बसावा, तसेच समाजातील वातावरण उत्साही आणि आरोग्यदायी रहावे यासाठी ध्वनी अथवा चित्रफितीद्वारे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोसायटी पार पाडणार आहे.

भोसला कॅम्पस हेल्पलाईनद्वारे त्वरीत मनुष्यबळ उपलब्ध करून देत नोंदी ठेवणे, रूग्णांची गरज ओळखून नाशिक सायकॅट्रिक सोसायटीकडे पाठवणे, तत्काळ सेवेसाठी वाहने उपलब्ध करून देणे याबरोबरच समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळणार आहे.