नाशिकमध्ये पावसाअभावी भातशेती संकटात, रोपे पिवळी पडण्यास सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी तालुक्यात दमदार पावसाअभावी रोपांची पुनर्लागवड खोळंबल्याने भातशेती संकटात सापडली आहे. 20 जुलैपर्यंत 78 हजार 613 पैकी 19 हजार 69 हेक्टर (24 टक्के) इतकीच पुनर्लागवड झाली आहे. अनेक ठिकाणी रोपे पिवळी पडण्यास सुरुवात झाली असल्याने उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण आहेत.

जिल्ह्याचा पश्चिम पट्टा हा दमदार पावसासाठी ओळखला जातो. आदिवासीबहुल पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा येथे भात हे प्रमुख पीक घेतले जाते. यंदा हे लागवडीचे उद्दिष्ट 78 हजार 613 हेक्टर इतके आहे. जूनमध्ये पाऊस होताच भाताची रोपे तयार करण्यात आली. ही रोपे सत्तावीस-अठ्ठावीस दिवसांची होताच त्यांची पुनर्लागवड होणे आवश्यक असते. मात्र, यंदा रोपे दीड-दोन महिन्यांची होत आली तरीही दमदार पाऊस झाला नसल्याने पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वरच्या बहुतांश भागात, दिंडोरीच्या पश्चिम पट्टयात आणि इगतपुरीच्या निम्म्या भागात पुनर्लागवड खोळंबली आहे.

मागील वर्षी जुलैच्या दुसर्या आठवडयापर्यंत बहुतांश भागात पुनर्लागवड झालेली होती. मात्र, यावेळी पावसाने पाठ फिरविल्याने रोपे मोठी होवून पिवळी पडण्यास सुरुवात झाली आहे. दमदार पावसाची वाट पाहण्यापलीकडे दुसरा उपायच नसल्याने शेतकर्यांपुढील चिंता वाढली आहे, अशी माहिती पेठ तालुक्यातील गावंडपाडा येथील शेतकरी यशवंत गावंडे यांनी दिली.

तालुकानिहाय भात लागवड झालेले क्षेत्र व कंसात टक्केवारी पुढीलप्रमाणे :
सुरगाणा – 2,733 (19), त्र्यंबकेश्वर – 1,695 (14), इगतपुरी – 11,011 (41), पेठ – 2,352 (24), िंदडोरी – 0 (0), कळवण – 378 (8), नाशिक – 727 (19).

ह सुरगाणा येथे जूनची सरासरी 270 मि.मी. असून, त्या तुलनेत 129 (47 टक्के), तर जुलैमध्ये 469 या सरासरीचा विचार करता 127 (27 टक्के) पाऊस झाला. इगतपुरीत जूनची सरासरी 495, तर पडलेला पाऊस 244 (57 टक्के), तर जुलैत 738 सरासरीच्या तुलनेत 242 (33 टक्के) पावसाची नोंद झाली. त्र्यंबकेश्वरला जूनची सरासरी 317 असून, प्रत्यक्षात 207 (65 टक्के), तर जुलैत सरासरी 568 असताना अवघा 154 (29 टक्के) पाऊस झाला. पेठला जूनमध्ये सरासरीच्या 40, तर जुलैत अवघ्या 34 टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे लागवडीवर परिणाम झाला आहे, अशी माहिती कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ यांनी दिली.