
26 डिसेंबरच्या अग्रलेखावरून संजय राऊत यांचा जेल मध्ये जाण्याचा रस्ता मी मोकळा करणार आहे. असे विधान करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, त्यांच्यासारखे आम्ही डरपोक आणि पळपुटे नाही. ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारे आम्ही नाही. हिमतीच्या आणि धाडसाचा गोष्टी कोण करतय? मी त्यांच्याबद्दल अजून काहीच बोललो नाही. एकेकाळी ते आमचे सहकारी होते. तुम्ही आम्हाला धमक्या देऊ नका. आधी राजवस्त्र बाजूला काढा आणि या मग मी दाखवतो. असा पलटवार संजय राऊत यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, झाकली मूठ सव्वा लाखाची आहे. माझ्या नादाला लागू नका. मी हिमतीने माझ्या पक्षासाठी तुरुंगात गेलोय. तुमच्यासारखी शरणागती पत्करून पळून गेलो नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, आम्ही नामर्द नाहीत. मला जेल मध्ये टाकायला तुमच्या हातात न्यायालय आणि कायदा आहे का? माझ्या जवळ अशा सर्वांची नोंद असून मला कोण काय बोलतय हे मी सरन्यायाधिशांना पाठवले आहे. नारायण राणेंची आर्थिक प्रकरणं बाहेर काढली तर ते 50 वर्ष जेल मधून सुटणार नाहीत.
यावेळी पत्रकार दिनानिमित्त ते म्हणाले की, मी माझ्या आयुष्याची सुरुवात पत्रकार म्हणूनच केली. राजकारणात अनेक पदे भूषविली. तरीही मी पत्रकार म्हणून जगतो. रोज सकाळी उठून मी वृत्तपत्र वाचतो. जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी सामनासाठी अग्रलेख लिहितो. पत्रकारिता हे माझं पॅशन आहे. गेल्या 45 वर्षांमध्ये मी पत्रकारितेतील बदल पहिले आहेत. समाजात बदल घडवण्याची ताकद पत्रकारितेतच आहे, असे मला वाटते. फक्त पत्रकारांचा कणा ताठ असला पाहिजे. स्वतःला पत्रकार म्हणणाऱ्यांनी हातात लेखणी घ्यायलाच हवी, तरच तो पत्रकार. पत्रकारिता हा व्यवसाय असला तरी त्यात धर्म दडलेला आहे. या धर्मामुळेच या देशात क्रांती होऊ शकली. या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल. या सगळ्या उलथापालथी या पत्रकारितेमुळे घडल्या. लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे किंवा बाळासाहेब ठाकरे असतील शिवसेनेसारखी जहाल संघटना ही लेखणी, कुंचला आणि वाणी यातून तयार झालेली संघटना आहे.
पुढे ते म्हणाले की, नाशिक मधील जे पदाधिकारी दुसरीकडे गेले आहेत, त्यातील 4 जणांचीही नावं कोणाला माहित नाहीत. अगदी नाशिककरांनाही त्यांची नावं माहित नाहीत. कोणीही येडेगबाळे पकडून प्रवेश करतात आणि दाखवतात. नाशिक मधील शिवसेना जशीच्या तशी आहे. दोन चार दलाल आणि ठेकेदार इकडे तिकडे गेले असतील. मात्र प्रमुख पदाधिकारी आणि जमिनीवरची शिवसेना आणि शिवसैनिक हे जागेवरच आहेत.
यावेळी योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याविषयी ते म्हणाले की, सामनाच्या अग्रलेखात आम्ही म्हटलंय की, योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आम्हाला प्रेम आणि आदर आहे. आम्ही जेव्हा अयोध्येत आणि मथुरेत गेलो तेव्हा त्यांनी आमचा आदर सत्कार केला व मदतही केली. ते एक संतगृहस्थ आणि सद्गृहस्थ आहेत. राजकारण बाजूला ठेवा, मुंबईत येऊन ते विकासाची गंगा त्यांच्या राज्यात घेऊन जात असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. त्यात चिंताग्रस्त होण्याचं कारण नाही. पूर्ण देशाचं पोट मुंबई भरतेय. सर्व राज्यांमधील जनता इथे राहत असून आम्ही त्यांना प्रेमाने सांभाळत आहोत, असे ते म्हणाले.


























































