औषधं-इंजेक्शनची चोरी डॉक्टरच करतात, गुजरातच्या राज्यपालांचे वादग्रस्त विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज ‘राष्ट्रीय डॉक्टर्स दिन’ (National Doctors Day) कोरोना महामारीच्या काळात नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टरांना विविध स्तरातून शुभेच्छा मिळत आहे. एकीकडे डॉक्टरांचे कौतुक होत असताना गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत (Acharya Devvrat) यांनी वादग्रस्त विधान केले आहे. राज्यपालांनी डॉक्टरांवर चोरीचा आरोप केला आहे. ‘दै. भास्कर’ने याबाबत वृत्त दिले आहे.

‘कोरोना महामारीच्या काळात नकली इंजेक्शन आणि औषधांची विक्री करण्यात आली, ऑक्सिजनचीही चोरी झाली. हे सर्व अशिक्षित शेतकरी किंवा मजूरांनी नाही तर उच्चशिक्षित डॉक्टर-इंजिनिअर आणि पदवीधारकांनी केले. असे विधान राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. तसेच पाप, बेईमानी, भ्रष्टाचार हे सर्व शिक्षित लोकांद्वारे केले जाते, असे असेल तर मग या लोकांच्या शिक्षित होण्याचा आणि पदवीधारक होण्याला काय अर्थ आहे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आचार्य देवव्रत यांना 2019 मध्ये गुजरातचे राज्यपालपद देण्यात आले होते. त्याआधी ते जवळपास चार वर्ष हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. हिमाचलचे राज्यपाल असताना त्यांनी राजभवनामध्ये ब्रिटिश काळापासून पाळण्यात येणारे रितीरिवाज बंद केले आणि होम-यंज्ञ करण्याची प्रथा सुरू केली होती.

दरम्यान, केंद्र सरकारने 1991 पासून राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यास सुरुवात केली. देशाचे महान डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. विधानचंद्र राय यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. राय यांचा जन्मदिन आणि पुण्यतिथी दोन्हीही 1 जुलैला असल्याने हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो.