
शिलाँगला हनिमूनला गेलेले इंदूरचे एक जोडपे अचानक बेपत्ता झाले. अखेर दहा दिवसांनी पतीचा मृतदेह खोल दरीत सापडला तर पत्नीचा अद्याप शोध सुरू आहे. राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी अशी जोडप्याची नावे आहेत. या घटनेमुळे रघुवंशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राजा आणि सोनम यांचा 11 मे 2025 रोजी इंदूरमध्ये विवाह पार पडला. यानंतर 20 मे रोजी ते मेघालयात हनिमूनसाठी गेले. मात्र 23 मे रोजी ते शिलाँगमधून अचानक बेपत्ता झाले. दोघांचे फोन बंद येऊ लागल्याने कुटुंबीय चिंतेत होते. अखेर कुटुंबीयांनी शिलाँग गाठले. कुटुंबीयांनी पोलीस आणि एनडीआरएफच्या मदतीने दोघांचा शोध सुरू केला.
दोघांनी फिरण्यासाठी भाड्याने घेतलेली स्कूटी सापडली. मात्र राजा आणि सोनमचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर दहा दिवसांनी एनडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांना खोल दरीत राजाचा मृतदेह सापडला. मात्र सोनमचा अद्याप शोध लागला नाही.