
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे एप्रिल 2025 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे. हल्ल्यापूर्वी लष्कर-ए-तैयबाच्या दहशताद्यांनी रेकी करण्यासाठी वापरलेला ‘गो-प्रो’ (GoPro) अॅक्शन कॅमेरा चीनमधील डोंगगुआन शहरात सक्रिय झाला होता, असा दावा एनआयएने (NIA) जम्मू न्यायालयात केला आहे.
चीनमधील वितरक AE ग्रुप इंटरनॅशनल लिमिटेडला ‘गो-प्रो हिरो 12 ब्लॅक’ हा कॅमेरा 30 जानेवारी 2024 रोजी पुरवण्यात आला होता आणि मध्य ग्वांगडोंग प्रांतातील औद्योगिक केंद्र असलेल्या डोंगगुआनमध्ये सक्रिय करण्यात आला होता, असे एनआयएच्या तपासात दिसून आले आहे. हा कॅमेरा कुणी खरेदी केला, तसेच तो कश्मीरमधील दहशतवादी मॉड्यूलपर्यंत कसा पोहोचला, याचा शोध घेण्यासाठी विशेष न्यायालयाने चीन सरकारला ‘लेटर रोगेटरी’ (Letter Rogatory) पाठवण्यास मंजुरी दिली आहे.
आपल्याकडे केवळ वितरकाची माहिती आहे. कंपनीकडे यापुढील व्यवहारांची (Downstream transactions) कोणतीही नोंद नसल्यामुळे हा कॅमेरा नेमका कुणी खरेदी केला आणि तो दहशतवाद्यांपर्यंत कसा पोहोचला, हे शोधण्यासाठी आता केवळ चीनी प्रशासन हाच एकमेव मार्ग असल्याचे कॅमेरा उत्पादक कंपनीने NIA ला कळवले आहे. मात्र, हिंदुस्थान आणि चीन यांच्यात थेट कायदेशीर करार नसल्यामुळे हा विनंती अर्ज संयुक्त राष्ट्रांच्या (UN) आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी करारांतर्गत पाठवला जाणार आहे, याला दोन्ही देशांनी मंजुरी दिली आहे. गृह मंत्रालयाने आधीच या प्रक्रियेला हिरवा कंदील दिला आहे. हा कॅमेरा दहशतवाद्यांच्या हालचाली, हल्ल्यापूर्वीची तयारी सिद्ध करण्यासाठी ‘महत्त्वाचा पुरावा’ मानला जात आहे.
गेल्या वर्षी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 25 पर्यटक आणि एका स्थानिक कश्मिरी नागरिकाचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा कट सीमेपलीकडून रचला गेल्याचा संशय असून आता चीनमधील या तांत्रिक पुराव्यामुळे तपासाला नवी दिशा मिळाली आहे.
























































