खेळता खेळता लुडोची सोंगटी गिळली, आठ वर्षाच्या चिमुकलीचा गुदमरून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकमधील थोक्काटु येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खेळता खेळता लुडोची सोंगटी गिळल्याने गुदमरून आठ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तनिष्का असे मृत मुलीचे नाव असून ती इयत्ता दुसरीत शिकत होती. मुलीचे पालक मूळचे कासारगोड जिल्ह्यातील उलियाथडका, मधुर येथील रहिवासी आहेत. मात्र नोकरीनिमित्त ते सध्या थोक्कोटुजवळील कोल्या येथे भाड्याच्या घरात राहतात.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेला सुट्टी असल्याने तनिष्का घरी भावंडांसोबत लुडो खेळत होती. यावेळी तिने चुकून तोंडात शंकूच्या आकाराची सोंगटी गिळली. यानंतर ती गुदमरू लागली. मुलीच्या आईला तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे लक्षात आले. आईने शेजाऱ्यांच्या मदतीने मुलीला ताबडतोब थोक्कोटु येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारासाठी डेरालकट्टे येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

शवविच्छेदन अहवालात मुलीच्या फुफ्फुसात एक प्लास्टिकचे खेळणे अडकल्याचे दिसून आले. यामुळे तिच्या श्वसनमार्गात अडथळा निर्माण झाल्याने तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि तिचा मृत्यू झाला.