
भोपाळच्या वृद्ध पर्यटकाचा गोव्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भाड्याने घेतलेली थार गाडी समोरून येणाऱ्या कारला धडकल्याने हा अपघात झाला. शहरातील हॅपी बार जंक्शनवर ही घटना घडली. या अपघातात कारमधील अन्य दोन जण किरकोळ जखमी झाले. तर पाच महिन्यांचं बाळ चमत्कारिकरित्या बचावले आहे. भगतराम शर्मा (65) असे मयत पर्यटकाचे नाव आहे.
शर्मा कुटुंब त्यांच्या खाजगी हॅचबॅक कारने गोव्यात पर्यटनासाठी आले होते. आसगावमधील हॅपी बार जंक्शनवरून कार जात असताना, एका भाड्याने घेतलेल्या थारने त्यांना जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अतिवेगामुळे थार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
स्थानिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत. थार चालकाने सदर कार भाड्याने घेतली होती. घटनेची निष्पक्षपणे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.




























































